Sambhajinagar News : ओल्या कचऱ्यातून गॅस निर्मिती, मनपा देणार बीपीसीएलला जागा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : ओल्या कचऱ्यातून गॅस निर्मिती, मनपा देणार बीपीसीएलला जागा

हर्सूल, चिकलठाणा, पडेगावमध्ये जागेचा शोध : दररोज ३५० टन कचऱ्याचा वापर

पुढारी वृत्तसेवा

Gas production from wet waste: Municipal Corporation to provide land to BPCL

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासोबतच त्यापासून गॅस निर्मिती करण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल टाकले आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने शहरात गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी महापालिकेकडून ओला कचरा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पासाठी हसूल, चिकलठाणा, पडेगाव यांसह आणखी एक-दोन ठिकाणी जागेचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२३) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची गुरुवारी (दि.२२) मुंबई येथे बीपीसीएलच्या गॅस प्रकल्पासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. शासनाच्या सूचनांनुसार या प्रकल्पासाठी प्राधान्याने ओला कचरा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कचरा व्यवस्थापन आणि प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातून दररोज सुमारे ५५० ते ६०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो.

त्यापैकी ३०० ते ३५० मेट्रिक टन कचरा ओला असतो. दरम्यान, महापालिकेचे तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू असून, बीपीसीएलच्या नव्या प्रकल्पासाठी या ओल्या कचऱ्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करताना त्यातून गॅस निर्मितीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

या गॅस प्रकल्पासाठी हसूल, चिकलठाणा आणि पडेगाव या भागांसह आणखी एक-दोन ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. याशिवाय सीएमआरडीएकडेही जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. योग्य जागा लवकर निश्चित करून ती बीपीसीएलला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीसोबत आवश्यक करार केला जाणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

पाइपलाइनद्वारे घराघरांत गॅसपुरवठा

बीपीसीएलकडून शहरात गॅस पाइपलाइनच्या माध्यमातून घराघरांत गॅसपुरवठा केला जात आहे. प्रस्तावित गॅस निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर त्यातून तयार होणाऱ्या गॅसचे वितरण करण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचेही आयुक्त येडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील ओल्या कचऱ्याचा उपयोग करून गॅस निर्मिती आणि त्याचे वितरण अशी व्यवस्था विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

विविध गॅस कंपन्यांशी चर्चा शहरातील ओल्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी | विविध सरकारी गॅस कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. या कंपन्यांच्या कामाचे मूल्यमापन करून सर्वोत्तम काम करणाऱ्या कंपनीकडे भविष्यात ही जबाबदारी सोपविण्यात येईल.
- समीर राजूरकर, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT