Gas in auto from domestic cylinder
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : येथील फुलंब्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या एस. के. टायर वर्क्स या दुकानात अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २५) दुपारी ४ वाजता छापा टाकून सुमारे १ लाख ६३ हजार ८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी घरगुती वापराचे एचपी गॅस सिलिंडर रिक्षामध्ये भरले जात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार नायब तहसीलदार (पुरवठा) राहुल खेडकर यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कारवाई केली.
छाप्यादरम्यान (एमएच-२० डीसी १६९६) ऑटो रिक्षामध्ये इलेक्ट्रिक मोटारच्या सहाय्याने गॅस भरताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. शेख रफिक रहमान मुशाहिद (५०, रा. खलील चौक, खुलताबाद) व रिक्षाचालक शेख मुशाहिद शेख महेमूद (२१, रा. बाजारगल्ली, स्टार कॉलनी, खुलताबाद अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून एक ऑटो रिक्षा, इलेक्ट्रिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार, गॅस नळ्या तसेच एचपी कंपनीचे चार घरगुती गॅस सिलिंडर असा एकूण १,६३,८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे व त्यांच्या पथकाने केली