Water Crisis Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Gangapur water crisis : गंगापूर तालुक्यातील तब्बल १८ गावे टंचाईग्रस्त

जलस्रोत आटल्याने टंचाई तीव्र, टँकर वाढविण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊनही गंगापूर तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील तब्बल १८ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून सध्या २० टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पुढील काही दिवसांत टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तालुक्यातील मध्यम व लघुप्रकल्पांमध्ये अद्याप ५० ते ६० टक्के जलसाठा शिल्लक असतानाही भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी व हातपंप आटत चालले असून ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर महिलांना व ग्रामस्थांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असतानाही जलसंधारण, योग्य जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या अभावामुळे जलस्रोत वेळेआधीच आटल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर वाढलेली भूजल पातळी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच झपाट्याने खाली येत असल्याने विहिरी व बोअरवेल तळ गाठत आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये शाश्वत जलस्रोतांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

प्रशासनाने टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यात ३ टँकर सुरू केले होते. त्यानंतर २३ एप्रिलपासून १३ टँकरद्वारे ११ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र वाढत्या मागणीमुळे सोमवारी आणखी ४ गावांसाठी ४ टैंकर मंजूर करण्यात आले. सध्या वैरागड, मालुंजा, तांदुळवाडी, उत्तरवाडी, बोलठाण, कोळघर, कणकोरी, शेकटा, बजनापूर, दिघी, काळेगाव, नागापूर, नरसापूर, सुल्तानाबाद खोपेश्वर, फुलशेवरा, अकोली वाडगाव व काटेपिंपळगाव या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

दरम्यान, तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक गावांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण झाले असले तरी पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळे योजना अपूर्णच राहिल्याचे दिसून येत आहे. येथे आडतच नाही तर पोहऱ्यात काय येणार अशी अवस्था या योजनेची झाली आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांसमोर नळांना पाणी कुठून आणायचे? हा मूलभूत प्रश्न उभा ठाकला आहे. काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून या कामांवर टीका होत असली तरी ठोस उपाययोजना अद्याप दिसून येत नाहीत. पाण्याचा शाश्वत स्रोत जोडल्याशिवाय हर घर नल योजना प्रभावी ठरणार नाही, असे मत अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मुख्य कारणांचा थोडक्यात आढावा

  • भूजलावर अति अवलंबित्व :

    पावसाळ्यानंतर जलसाठा वाढला तरी त्याचे पुनर्भरण व्यवस्थित न झाल्याने विहिरी/बोअरवेल लवकर आटतात.

  • जलसंधारणाची अपुरी कामे:

    बंधारे, शेततळी, गाळ काढणे यासारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या नाहीत.

  • सिंचनातील असमतोलः

    पाण्याचा मोठा वापर शेतीसाठी होतो, पण सूक्ष्म सिंचन कमी प्रमाणात वापरले जाते.

  • योजनांची अपूर्ण अंमलबजावणी :

    हर घर नल किंवा जलजीवन मिशनसारख्या योजनांमध्ये स्रोताशिवाय फक्त पाईपलाइन टाकल्याने प्रत्यक्ष फायदा होत नाही.

उपाययोजना

  • तातडीचे उपाय: टँकर व्यवस्थापन अधिक पारदर्शक व नियमित करणे. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य वितरण गळती रोखण्यासाठी पाईपलाइन दुरुस्ती.

  • दीर्घकालीन उपाय : भूजल पुनर्भरण, बंधारे, पेरकोलेशन टाक्या, शेततळी मोठ्या प्रमाणावर उभारणे.

  • पिक पद्धतीत बदल : ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाणी लागणारी पिके,

  • सूक्ष्म सिंचनाचा प्रसार: अनुदान व सक्ती स्थानिक जलव्यवस्थापन समित्या. गावपातळीवर पाण्याचे नियोजन स्रोत + वितरण दोन्हीवर लक्ष. फक्त नळजोडणी नव्हे तर शाश्वत जलस्रोत निश्चित करणे.

प्रभावी जलव्यवस्थापनाची गरज

पुढील दोन महिने लक्षात घेता टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन जलसंधारण, प्रभावी जलव्यवस्थापन आणि पर्यायी जलस्रोत उभारणीवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT