गंगापूर : गंगापूर तालुक्यातील शिंगी येथील गट नंबर 60, शिवार पिंपरी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करत 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग््राामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिंगी येथील शेतकरी एकनाथ जगन्नाथ वाघ (वय 55) यांच्या राहत्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला. घरातील सदस्य गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या चोरीमध्ये झुंबर, वेल, तीन नथांच्या जोड्या, बाळ्यांच्या पाच जोड्या, लहान मुलांच्या हातातील तीन जोड कडे, दोन चेनच्या जोड्या तसेच एक तोळ्याचे पोत असा मौल्यवान सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला. चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 85 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. ग््राामीण भागात सलग वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलिस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के तसेच गोपनीय शाखेचे मनोज नवले यांनी भेट देत पंचनामा केला. यावेळी श्वान पथकाला पाचारण करून परिसरात कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के करीत आहेत.