Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : शेंदूरवादा-सावखेडा रस्त्यावरील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा

जीपखाली चिरडून तरुणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : शेंदूरवादा-सावखेडा रस्त्यावर बोलोरो वाहनाने दुचाकीला धडक देऊन पवन शिवराम मोढे यांचा खून केल्याप्रकरणी गंगापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपी सचिन भगचंद वाघचौरे व विशाल रुपचंद वाघचौरे यांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, तसेच शिवराम मोढे यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोपी रुपचंद लक्ष्मण वाघचौरे याला खुनास प्रवृत्त केल्याप्रकरणी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, तसेच खुनाच्या प्रयत्नास प्रवृत्त केल्याप्रकरणी दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल ए. शिंदे यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी दिला. प्रकरणात आरोपी राम विठ्ठल सोलत व संदीप आबासाहेब बार्डे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

प्रेमविवाहाच्या रागातून कटाचा आरोप

न्यायालयीन नोंदीनुसार, २८ मार्च २०२४ रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास पवन मोढे व त्यांचे वडील शिवराम मोढे हे दुचाकीवरून शेंदूरवादा-सावखेडा रस्त्याने जात होते. राष्ट्रमाता स्कूलजवळ मागून आलेल्या बोलोरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर वाहन पुन्हा वळवून पवन यांच्या अंगावरून नेण्यात आले.

यात पवन यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवराम मोढे यांनी बाजूला होत आपला जीव वाचवला. या प्रकरणात प्रेमविवाहाच्या कारणातून पवन यांच्या कुटुंबीयांविषयी राग असल्याचे अभियोजन पक्षाने न्यायालयासमोर मांडले होते. मोबाईल कॉल रेकॉर्ड, टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या भूमिकेचा तपास करण्यात आला.

आरोपी क्र. ४ व ५ यांना दिलासा

आरोपी क्रमांक ४ राम सोलट याच्याविरुद्ध केवळ दूरध्वनी संपर्काचा पुरावा असून गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग किंवा ठोस कटाचा पुरावा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक ५ संदीप बर्डे हा घटनास्थळी उपस्थित असल्याचे अथवा गुन्ह्यात सहभागी असल्याचे ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

न्यायालयाने आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्याविरुद्धचे आरोप पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्याचे नमूद केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्त्ता अॅड. मंगेश आर. जाधव यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत अॅड. ए. के. चव्हाण हेही सरकार पक्षातर्फे उपस्थित होते. या प्रकरणातील वाळूज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता मुख्य तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजेंद्र विठ्ठलराव सहाणे व पोलिस सब इन्स्पेक्टर सखाराम दिलवाले यांनी तपास केला होता.

१८ साक्षीदारांच्या साक्षी; डिजिटल पुराव्यांनाही महत्त्व

खटल्यादरम्यान अभियोजन पक्षाने एकूण १८ साक्षीदार तपासले. न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी शिवराम मोढे यांची साक्ष विश्वासार्ह असल्याचे नमूद केले. घटनास्थळी आढळलेले बोलोरो वाहन, दुचाकीची अवस्था, रक्ताचे डाग तसेच इतर परिस्थितीजन्य पुराव्यांचाही न्यायालयाने विचार केला. मोबाईल सीडीआर, एसडीआर व टॉवर लोकेशनच्या पुराव्यांतून आरोपी क्रमांक १ व २ हे घटनेच्या वेळी एकत्र असल्याचे तसेच आरोपींमध्ये परस्पर दूरध्वनी संपर्क झाल्याचे न्यायालयाने नोंदविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT