गंगापूर : गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन बोटी, इंजिन, पाईप तसेच उपसा करून साठवून ठेवलेली वाळू असा एकूण १६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोदावरी नदीपात्रात काही व्यक्ती बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने नदीपात्रात छापा टाकला. या कारवाईदरम्यान वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन बोटी ताब्यात घेतल्या.
पहिल्या कारवाईत अमोल नवगिरे (रा. जामगाव, ता. गंगापूर), त्याचा भागीदार सुदाम संजय चुंगडे (रा. पेंडापूर, ता. गंगापूर) तसेच बोटीवरील चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ८ लाख रुपये किमतीची लाल-काळ्या रंगाची बोट, त्यावरील इंजिन व वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे पाईप जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळी उपसा करून ठेवलेली अंदाजे चार ब्रास वाळूही पोलिसांनी ताब्यात घेतली. या गुन्ह्यात एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर दुसऱ्या कारवाईत राधेश्याम कोल्हे (रा. अमळनेर, ता. गंगापूर), त्याचा भागीदार नितीन ऊर्फ भावड्या मगर (रा. जामगाव, ता. गंगापूर) आणि बोटीवरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणीही वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी बोट, इंजिन, पाईप आणि अंदाजे चार ब्रास वाळू असा ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोदावरी नदीपात्रातून होत असलेला अवैध वाळू उपसा हा पर्यावरणासाठी तसेच शासनाच्या महसुलासाठी मोठा धोका ठरत आहे. नदीपात्राची रचना बदलणे, पाण्याची पातळी कमी होणे, नदीकाठांची धूप वाढणे यासारखे गंभीर परिणाम अशा प्रकारच्या अवैध उत्खननामुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.