गंगापूर : एलपीजी गॅस टँकरमधून अनधिकृतरीत्या गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार रांजणगाव पोळ शिवारात उघडकीस आला. या प्रकरणी महसूल विभाग आणि शिल्लेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टँकर, त्यातील सुमारे ११ हजार ७२० किलो गॅस, भरलेले व रिकामे सिलिंडर आणि गॅस हस्तांतरणाचे साहित्य असा एकूण ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव पोळ शिवारात हॉटेल वेलकमच्या बाजूला गट क्रमांक ५९ मधील बंद पत्र्याच्या शेडसमोरील मोकळ्या जागेत हा प्रकार सुरू होता. १८ ऑक्टोबर रोजी रात्री एलपीजी गॅसचा अनधिकृत भरणा सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यानंतर पुरवठा निरीक्षक अमोल कासार व इरफान पटेल हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी शिल्लेगाव पोलिसांचे पथकही तेथे दाखल झाले.
पाहणीदरम्यान एमएच-०४-एमआर-३०६९ क्रमांकाच्या एलपीजी टँकरमधून पाइपच्या साहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळले. घटनास्थळी टँकरचालक संजय दत्तात्रय खंडागळे याच्यासह गॅस हस्तांतरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि विविध क्षमतेचे सिलिंडर आढळून आले. पथकाला पाहून एक जण घटनास्थळावरून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी करण्यात आला गुन्हा दाखल आहे. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर, गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस हवालदार हरणे, जेजूरकर आणि पोलिस शिपाई रवी दाभाडे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.
विविध क्षमतेचे सिलिंडर
कारवाईदरम्यान सुमारे ३५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा एलपीजी टँकर आणि त्यातील अंदाजे ११ हजार ७२० किलो गॅस, ज्याची किंमत १२ लाख ८ हजार ३३२ रुपये आहे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय व्यावसायिक वापराचे सहा भरलेले, ४० रिकामे आणि पाच किलो क्षमतेचे २३ रिकामे सिलिंडर, रबरी पाइप, नोजल व अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपये आहे.