गंगापूर :तालुक्यातील गवळीशिवरा येथील लघु प्रकल्पाची पाणीपातळी अत्यल्प पावसामुळे तळाला गेली असताना, या प्रकल्पातील उरलेल्या तुटपुंज्या पाणीसाठ्यावर काही शेतकऱ्यांकडून विद्युत मोटारींच्या सहाय्याने दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी अवैध पाणी उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या या साठ्यावरच डल्ला मारला जात असल्याने सात गावांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गवळीशिवरा पेयजल योजनेच्या माध्यमातून गवळीशिवरा, खडक नारळा, वसूसायगाव, फुलशिवरा, प्रतापपूरवाडी, गवळी धानोरा व आरापूर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने नदी-नाले कोरडे पडले असून खरीप पिकेही पाण्याअभावी करपली आहेत. अशा परिस्थितीत प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असताना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
काही शेतकऱ्यांकडून वीज चोरी करून पाणी उपसा केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, दरम्यान, "गेल्या आठवड्यातच प्रकल्पाची पाहणी केली आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा संयुक्त्त पाहणी करण्यात येईल. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुदर्शन तवार यांनी दिला. काही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून अधिकृत परवानगी घेतली असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिकृत उपसा आणि अवैध उपसा याची पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
गवळीशिवरा धरणातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशाबाबत संबंधित पाटबंधारे विभागाला तातडीने कारवाईच्या सूचना देण्यात येतील.नवनाथ वगवाड, तहसीलदार, गंगापूर