गंगापूर : मिक्सरची दुचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी (दि.२) सकाळी ८ च्या सुमारास देवगाव राज्य मार्ग क्र. ३९ वर घडली. भाऊसाहेब किसनराव शेजूळ (वय ५५) असे मृत वडिलांचे नाव आहे.
गंगापूर तालुक्यातील वैरागड येथील भाऊसाहेब शेजूळ हे गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास आपल्या १७ वर्षीय मुलीला शिवानीला क्लासला सोडण्यासाठी निघाले होते. त्याचबरोबर हनुमान जयंतीनिमित्त बजरंगबलीला नारळ अर्पण करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते.
वळई नदीच्या पुलाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामामुळे मृत्यूचा सापळा तयार झाला होता. त्याठिकाणी मिक्सर मशीन रिव्हर्स घेत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात घडला. चालकाने कानात हेडफोन लावलेले होते आणि वाहनाला मागील आरसाही नव्हता. त्यामुळे मागे काय घडत आहे, याची त्याला कल्पनाच आली नाही. निष्काळजीपणे घेतलेल्या रिव्हर्समध्ये मिक्सर मशीनने दुचाकीसह बाप-लेकीला तब्बल ५० फूट फरफटत नेले. या हृदयद्रावक घटनेत भाऊसाहेब शेजूळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवानी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची भीषणता इतकी होती की, दुचाकी पूर्णपणे मिक्सर मशीनखाली चिरडलेली आढळली. भाऊसाहेब शेजूळ हे साधे, मेहनती दूध उत्पादक शेतकरी होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. शिवानी ही तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्वामी समर्थ विद्यालयात इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रस्ते कामातील निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या अभावामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.