Bribery case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur bribery case : 'परत आल्यावर संपवून टाकतो'; लाचखोर हेड कॉन्स्टेबलची उपनगराध्यक्षांना धमकी

'एवढ्या कारवाईने माझे काही वाकडे होत नाही,' म्हणत शिवीगाळ : गंगापूर पोलिस ठाण्यासमोरील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलने गंगापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल सुभाषराव जगताप यांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'एवढ्या कारवाईने माझे काही वाकडे होत नाही. मी परत आल्यावर तुम्हाला संपवून टाकतो. तुमची औकात नाही, नंतर दाखवतो,' अशी धमकी दिल्याचे जगताप यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

यानंतर जगताप व वानखेडे मोटारसायकलवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गेले. पोलिस ठाण्यासमोर चौकशी करीत असताना रात्री ११.२८ वाजता पोलिस हेड कॉन्स्टेबल शकील शेख हे स्वप्निल गायकवाड व अन्य चार-पाच जणांसह पोलिस ठाण्याच्या पाठीमागून समोर आले.

यावेळी शकील शेख यांनी जगताप व वानखेडे यांच्याकडे पाहून वरीलप्रमाणे धमकी दिली. तसेच आईवरून शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शकील शेख असे या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.

उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, गुरुवारी (१० सप्टेंबर) रात्री ११ वाजता ते त्यांचे मित्र राहुल दुर्योधन वानखेडे यांच्यासोबत पटेल टी हाऊससमोर उभे होते. त्यावेळी त्यांचे मित्र गणेश राजपूत यांनी स्वप्निल गणेश गायकवाड हा पोलिस ठाण्यात असून, त्याच्यासोबत काहीतरी प्रकार झाल्याचे सांगितले.

वॉरंटची 'सेटिंग' करण्यासाठी पाच हजारांची मागणी

गंगापूर : अटक वॉरंटची कारवाई टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गंगापूर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी (दि. १०) रंगेहात पकडले. शकील सत्तार शेख (वय ४२) असे ताब्यात घेतलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, पोलिस ठाण्यातीलच एका कक्षात हा सापळा रचण्यात आला.

एका ३० वर्षीय मजूर व्यक्तीच्या नावाने अटक वॉरंट निघाले होते. त्यावर अटक कारवाई न करता मदत करण्यासाठी शेख याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची १० सप्टेंबर रोजी गंगापूर पोलिस ठाण्यात पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीत तीन हजार रुपये स्वीकारण्यास शेख तयार झाला.

एसीबीने त्यानंतर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची रक्कम शेख याने पोलिस ठाण्यातील कक्षात पंचासमक्ष स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने शेखला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गंगापूर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. शेख याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी (दि. १०) रात्री ११.३० वाजता ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजू बी. नांगलोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलिस हवालदार सिनकर व पोलिस हवालदार तोडकर यांचा समावेश होता. पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या पर्यवेक्षणाखाली, पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT