Gangapur : A young man was fatally attacked with a knife by a gang in Rajiv Gandhi Chowk
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अत्यंत दत्तू भक्कड २३ वर्षीय तरुणावर गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरात जुन्या वादाची खुन्नस उफाळून येत एका सहा जणांच्या टोळक्याने धारदार चाकूने जीवघेणा हल्ला चढवला.
पोट, पाठ, डोके आणि कानाजवळ सपासप वार करून तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्याची थरारक घटना बुधवारी (दि.२८) रात्री घडली. या हल्ल्यात दत्तू संतोष भक्कड हा तरुण गंभीर जखमी झाला असून गंगापूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८.४५ वाजता राजीव गांधी चौकातील बंडू यांच्या चहाच्या हॉटेलजवळ ही घटना घडली. आतिष गायकवाड याने दत्तूला सकाळी आपल्यासह राहुल फुलारे याला शिवीगाळ का केली, असा जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी दत्तूला शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी राहुल फुलारे याने चाकूने दत्तूच्या पोटावर, पाठीवर, कानाजवळ व डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
जखमी दत्तूची आई छाया संतोष भक्कड (वय ४०, रा. सखारामपंतनगर, गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड आणि विशाल कापसे या सहा जणांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.