Sambhajinagar News : गंगाखेड-परळी महामार्गाची ७ वर्षांपासून साडेसाती कायम  file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : गंगाखेड-परळी महामार्गाची ७ वर्षांपासून साडेसाती कायम

संथगतीने होतेय काम; दर्जाबाबत तक्रारी, रेडियम व दिशादर्शकांअभावी वाढला अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड-परळी महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाला सुरुवात होऊन तब्बल ७ वर्षे उलटली. मात्र या महामार्गाची साडेसाती अद्याप संपली नाही. एप्रिल २०१९ मध्ये सुरू झालेले काम आजही संथगतीने सुरू असून अपूर्ण रस्ता, कामातील अडथळे, दर्जाबाबत तक्रारी, बाह्यवळणांवर रेडियम पट्टचा व दिशादर्शक फलकांचा अभावामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला. ७ वर्षांतही महामार्ग पूर्ण होत नसेल तर कंत्राटदाराला अभय कोणाचे व कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा करते काय? असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे.

सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाल्यानंतर प्रवास सुरक्षित व सुखकर होईल, अशी अपेक्षा वाहनधारकांना होती. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने वाहनधारकांची गैरसोय वाढली. यामुळे पूर्वीचा डांबरी रस्ताच बरा, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

शहरातील परळी नाका परिसरापासून परळी रस्त्यावरील सुमारे दोन किमी टप्प्यात गेल्या वर्षभरापासून काम संथगतीने आहे. अपूर्ण रस्ता, ठिकठिकाणी सुरू काम, मातीचे ढिगारे व पर्यायी मार्गामुळे वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीला परिस्थिती अधिक गंभीर बनते. बाह्यवळणांवर रस्त्याची दिशा स्पष्ट करणारे रेडियम पट्टे, दिशादर्शक फलक व इशारा खुणा पुरेशा प्रमाणात नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. महामार्गाचे काम वर्षानुवर्षे रखडले असताना संबंधित कंत्राटदाराच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीतील यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली.

कामाच्या विलंबाची कारणे काय? कामाची निर्धारित मुदत किती होती? त्याला किती मुदतवाढ दिली ? कामाच्या दर्जाची तपासणी कोणत्या पातळीवर झाली? सुरक्षा उपाययोजनांची नियमित पाहणी होते का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. कंत्राटदार व संबंधित यंत्रणेच्या कथित संगनमतामुळे या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही होत आहे.

या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. गंगाखेड-परळी महामार्गावरील बाह्यवळण ठिकाणी रात्री वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज यावा, यासाठी रेडियम पट्टया, दिशादर्शक फलक व इशारा खुणा अत्यावश्यक आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या मूलभूत सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याची तक्रार आहे.

अपघातानंतर पंचनामे नकोत; आधी सुरक्षा द्या

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पंचनामा व चौकशी करण्यापेक्षा अपघात होऊ नयेत, यासाठी आधीच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, सात वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामात वाहनधारकांच्या सुरक्षेला पुरेसे प्राधान्य दिले जात आहे का, हा प्रश्न कायम आहे. संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या दर्जाची तपासणी करावी. बाह्यवळणांवर रेडियम पट्टया, दिशादर्शक फलक, रात्री स्पष्ट दिसणारे इशारा फलक, बॅरिकेड्स व आवश्यक प्रकाशव्यवस्था उभारावी. रखडलेले काम निश्चित कालमयदित पूर्ण करून कामाच्या दर्जाबाबतच्या तक्रारींची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT