Arrest Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : घर फोडून तिजोरीसह ३५ लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

२०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासात ३६ तासांत लावला छडा; तिजोरी ड्रेनेजमध्ये, तर दुचाकी फेकली विहिरीत

पुढारी वृत्तसेवा

Gang arrested for breaking into house, stealing safe and jewellery worth Rs 35 lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुटुंब पर्यटनासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडत तब्बल ३५ लाखांचे हिरेजडित दागिने आणि बायोमेट्रिक तिजोरी पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनासह चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवघ्या ३६ तासांत तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी या गुन्ह्याचा थरारक तपास पूर्ण केला.

म्हाडा दर्गा रोड परिसरातील रामकृपा कॉलनीत राहणाऱ्या विद्युत ठेकेदार मोनिका अविनाशकुमार सिंघ (३६) या २६ मे रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह कोकण व मुंबई पर्यटनासाठी गेल्या होत्या. ३१ मे रोजी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत कपाटातील जड बायोमेट्रिक तिजोरी दुचाकीवरून पळवली होती.

या तिजोरीत ३९ ग्रॅमचा डायमंड नेकलेस, सोन्याच्या ३ अंगठ्या, ५ ग्रॅमचे डायमंडचे कानातले, २६ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याची नाणी असा एकूण १४८ ग्रॅमचा ऐवज होता. सोबतच अॅपलचे स्मार्ट वॉच आणि टायटन ब्रँडची महागडी घड्याळेही होती.

हिरे विकताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात

या घटनेनंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर आणि अर्जुन कदम यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. फुटेजमधील देहबोलीवरून पोलिसांनी प्रेम खरे याला ओळखले आणि तिघांच्या घरावर एकाच वेळी छापा मारून त्यांना वेड्या ठोकल्या.

चोरट्यांनी चोरीचे सोन्याचे दागिने दत्ता बबन दहिवाल (४०, रा. सातारा परिसर) याला विकले होते. मात्र हिरेजडित दागिने विकण्यासाठी त्यांना शहरात कुणीही ग्राहक मिळत नव्हता. हिरे विकण्यासाठी ते ग्राहकाचा शोध घेत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी दहिवाल यालाही अटक करून त्याच्याकडून ६२ हजारांचे दागिने, तर मुख्य आरोपींच्या घरातून ३४ लाख ७१ हजारांचे दागिने जप्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT