Chatrapati sambhajinagar crime 
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati sambhajinagar crime |गजानननगर हादरले; गॅसचा स्फोटात महिलेचा मृत्यू

नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले; नगरसेवकासह उपमहापौरांची बचाव कार्यात मदत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील गजाननगर गल्ली न .1 मधील एका दोन मजली घराला शनिवारी (दि.20) पहाटे 4.30 वाजता आग लागली. आगीत गॅसचा स्फोट झाला असून, यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. यावेळी कुटुंबातील नऊ जणांना सुखरूप घराबाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. यासाठी शहरातील नगरसेवकांसह उपमहापौर यांनीही बचावकार्यमध्ये मदत केली.

गजाननगरातील मोरे यांच्या घराला शनिवारी पहाटे सुमारे 4.30 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्र आणि पदमपुरा मुख्य अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान,तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले होते. आग एवढी भीषण होती की,  घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. घरात अनेक सदस्य अडकल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अशोक दामले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन मदतीला धावले. आग भीषण स्वरूप धारण करत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीच्या ज्वाळांनी काही क्षणांतच संपूर्ण घराला वेढा घातला होता. सिलिंडर स्फोटामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. धूर आणि उष्णतेमुळे घरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक बनले होते. मात्र अग्निशमन जवान आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधीनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू ठेवले. अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरातील नऊ सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र सुनंदा मोरे यांना वाचविण्याचे प्रयत्न अपुरे ठरले. त्या आगीत गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

सुनंदा मोरे यांचा दुर्दैवाने मृत्यू

महारुद्र हनुमान मंदिराजवळ असलेल्या मोरे यांच्या घराचा खालीच असलेल्या फिल्टर रिपेरींग दुकानातून आगीला सुरुवात झाली. दुकानाच्या मागे ठेवलेल्या एका सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घराला आग लागली त्यामध्ये नऊ जण सुरक्षित असून दुर्दैवाने सुनंदा राजेंद्र मोरे (४५) या महिलेचा मृत्यू झाला.

बचाव कार्यात मदत

या घटनेची माहिती ज्ञानेश्वरदाजी वाघलवाले यांनी फोन करून लोकप्रतिनिधीना दिली. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अशोक दामले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच गणेश मालकर, नारायण इंदापुरे, विशाल गायके, कांतीलाल निलपगार तसेच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे अशोक भंडारे, भालेराव यांच्यासह अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी  विनायक कदम, संजय कुलकर्णी,  छत्रपती केकान, संदीप चव्हाण, अग्निशामक जवान अशोक वेलदोडे, बाबासाहेब ताठे, अक्षय नागरे, सचिन शिंदे, मतीन शेख, विलास झरे, माधव गाडे, वाहन चालक चंदनशिव, गव्हाड, नंदू घुगे यांच्यासह आदींनी बचावकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT