छत्रपती संभाजीनगर:
‘हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा। कानडा राजा पंढरीचा ।’
हा अभंग सुप्रसिद्ध गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी लिहिला आहे. ‘झाला महार पंढरीनाथ’ (१९७०) या चित्रपटात या अभंगाचा समावेश करण्यात आला आहे. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेला आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या या अभंगात ..हा नाम्याची खीर चाखतो या ओळी मराठवाड्यात जन्मलेल्या संताशी संबंधित आहेत. ते आहेत संत नामदेव. हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव हे त्यांचे गाव. नर्सीला त्यांचा जन्म झाला. याठिकाणी त्यांचे भव्य मंदिरसुद्धा आहे.
नाम्या हे बाल्यावस्थेत म्हटले जाणारे नाव. दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता. रेळेकर हे त्यांचे आडनाव. ते व्यवसायाने शिंपी होते. परंतु भक्तीमार्गासाठी असणारी ओढ त्यांना नर्सी गावात स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी आपले कुटुंब पंढरपुरात हलविले. तेथे व्यवसायाबरोबरच हरिभक्तीत ते गुंतून गेले. त्यांचा मुलगा नामदेव याच्यावर बालपणापासूनच पांडुरंगाचा प्रभाव पडलेला.
एके दिवशी त्याची आई त्याला म्हणाली की, आज देवाला प्रसाद तू दाखव. आईने सांगितल्यामुळे खिरीची वाट घेवून नामेदव पांडुरंगाच्या मूर्तीपुढे उभे राहिले. पण मूर्ती प्रसाद कशी ग्रहण करणार? बाल नामदेवालाही काही कळेना..तेव्हा त्याने आग्रहच धरला की जोपर्यंत खिर खात नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. ते देवापुढे हट्ट धरून बसले. नामदेव महाराज विठूरायाचे निस्सीम भक्त होते. म्हणून विठोबाने खिरपुरीचा नैवद्य खाऊन खाल्ला आणि त्यानंतर नामेदव घरी परतले.
या प्रसंगावरून..हा नाम्याची खीर चाखतो अशी रचना तयार झाली. ते रिकामे ताट घरी घेऊन गेल्यानंतर. आईने विचारले, नैवद्य कुठे आहे, तेव्हा नामदेवांनी सांगितले, नैवेद्य देवाने खाल्ला.त्यावर आईवडिलांचा विश्वास बसला नाही. दुसर्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांना नामदेवाची महती कळून आली.
संत नामदेवांनी गुरू करावा, अशी सूचना प्रत्यक्ष विठोबारायांनी केली आणि त्यांना औंढ्याला पाठविले, अशी दंतकथा आहे. नामदेव महाराज हरिकीर्तन करीत देशभर हिंडले. पंजाबात त्यांचे काही काळ वास्तव्य होते. त्यांच्या काही रचनांचा समावेश गुरू ग्रंथ साहिबात आहे. त्यामुळे शीख धर्मियांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. नर्सी नामदेव येथे गुरूव्दाराही उभारण्यात आला आहे. 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥' हा संत नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे。यातून भगवंताच्या भक्तीत आणि कीर्तनाच्या आनंदात तल्लीन होऊन, ज्ञानाचा प्रकाश सर्व जगात पसरवण्याचा संदेश दिला आहे
परतवारी सोहळा
आषाढी एकादशीची यात्रा व आषाढीनंतर येणाऱ्या एकादशीला परतवारी सोहळा असे म्हणतात. ही परतवारी नर्सी नामदेव येथे होते. त्यामुळे या काळात वारकरी मोठ्या संख्येने नर्सीत असतात. आषाढी वारीला पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांची वारी संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नर्सीला प्रतिपंढरपूर असेही म्हटले जाते.
पापमोचनी एकादशीस ( मार्च-एप्रिल महिना) मिठाची यात्रा भरते. त्यावेळी, येथे धान्याच्या मोबदल्यात मीठ खरेदी करण्याची परंपरा आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या मुख्य महाद्वाराची पहिली पायरी 'नामदेव पायरी' या नावाने ओळखली जाते. संत नामदेवांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होत असताना, "भक्तांच्या पायांची धूळ सदैव मस्तकास लाभावी" या भावनेने याच ठिकाणी समाधी घेतली होती. त्यामुळे पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी या पायरीवर नतमस्तक होऊनच मंदिरात प्रवेश करतो.