Sambhajinagar News : रस्ते विकास आराखड्याला निधीचा अडथळा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : रस्ते विकास आराखड्याला निधीचा अडथळा

पाडापाडीला ब्रेक : मनपा प्रशासन आता निवडणूक तयारीत व्यस्त

पुढारी वृत्तसेवा

Funding hurdles to road development plan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक निधी मिळाला नसल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली असून, मंजूर विकास आराखड्यानुसार मनपाकडून सलग तीन महिने सुरू असलेली अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मोहिमेला आता ब्रेक लागला आहे. या मोहिमेत तब्बल साडेपाच हजारांहून अधिक मालमत्तांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र रस्त्यांची कामे अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत असताना आता महापालिकेचे लक्ष निवडणुकीच्या तयारीकडे वळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महापालिकेने मंजूर विकास आराखड्याप्रमाणे रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी जून महिन्यापासून मोहीम हाती घेतली होती. सातारा देवळाई, बीड बायपास, महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रोड, केंब्रीज चौक ते महावीर चौकादरम्यान जालना रोड, सिडको चौक ते हर्सल या पाच रोडवरील सुमारे साडेपाच हजार अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत रस्ते मोकळे झाले असले तरी रस्त्यांच्या कामांना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही.

महापालिकेने या रस्त्यांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. परंतु शासनाने सध्या निधी मंजूर करण्यास नकार दिल्याने प्रकल्प थांबले आहेत. या रस्त्यांच्या विकासासाठी मपेडिकोफ या सल्लागार संस्थेमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. हा आराखडा महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महार- ाष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होणार आहे.

शासनस्तरावर मंजुरीनंतरच निधीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पाडापाडी मोहिमेनंतर अनेक ठिकाणी अर्धवट पाडलेल्या इमारती आणि ढासळलेल्या मालमत्ता तशाच उभ्या आहेत. अनेक मालमत्ताधारकांनी पाडलेल्या भागाची दुरुस्ती केली नाही. परिणामी या परिसरात असुरक्षित व अस्ताव्यस्त स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीनंतरही या मालमत्तांचे तसेच चित्र दिसत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेघर झालेल्या मालमत्ताधारकांना म्हाडाकडून घरे मिळालेली नाहीत. तसेच महापालिकेने नुकसान भरपाईबाबतही कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सणानंतर प्रशासनाची निवडणूक तयारी

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या सणामुळे पाडापाडी मोहिमेला पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाला नाही. त्यानंतर प्रशासनाने महापालिका निवडणुकीच्या तयारीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रभाग रचना, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणे, आरक्षण सोडत काढणे आणि राखीव जागा निश्चित करणे या कामांना गती देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी कामाला लावण्यात आले आहेत.

पाडापाडी झाली विकासकामे कधी ?

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या प्रशासनाचे सर्व लक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीकडे वळले आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी मार्किंग झालेल्या भागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुन्हा सुरू होण्याची शक्यता अत्यंत क्षीण आहे. नागरिक मात्र यावर नाराजी व्यक्त करत असून, पाडापाडी झाली पण विकासकामे नाहीत, अशी टीका शहरात सर्वत्र व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT