Fourth list of loan waivers, 17,484 farmers in Sambhajinagar, 12,926 farmers in Jalanya eligible
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नुकतीच चौथी यादी जाहीर झाली. यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ४७हजार ५४७शेतकऱ्यांचा समावेश असून, छत्रपती संभाजीनगर। जिल्ह्यातील सर्वाधिक १७ हजार ४८४ तर, जालना जिल्ह्यातील १२ हजार ९२६ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने कर्जमुक्तीची चौथी यादी गुरुवारी (दि.२२) प्रसिद्ध केली. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीक कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभदेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक १७ हजार ४८४ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर या पाठोपाठ जालन्यातील १२ हजार ९२६ शेतकऱ्यांचा या चौथ्या यादीत समावेश केला आहे.
बीड जिल्ह्यातील ४ हजार ७९१, नांदेडमधील ४ हजार १६१, परभणीतील २ हजार ९८६ आणि लातूरमधील २हजार ५२९ शेतकरी पात्र ठरले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील १ हजार ६६१, तर हिंगोली जिल्ह्यातील १ हजार नऊ शेतकऱ्यांचा यादीत समावेश आहे.
आधी २४.६७ लाख शेतकरी ठरले पात्र
योजनेंतर्गत प्रसिद्ध यापूर्वीच्या तीन याद्यांमध्ये राज्यातील २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांचा केला होता. आता चौथ्या यादीमुळे मराठवाड्यातील आणखी हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार लाभ
शासनाकडून जाहीर यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जथकबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.