छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-९ रायगडनगर परिसरात शुक्रवारी (दि.७) मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार जणांच्या टोळीने मेडिलक दुकानांना लक्ष्य करत गल्ल्यातील रोकड पळवली. चोरीसाठी कोणतेही हत्यार न वापरता केवळ हाताच्या ताकदीने शटर उचकटण्याची नवी पद्धत या चोरट्यांनी वापरली आहे. या प्रकरणी दोन मेडिकल फोडल्याचे सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य एका मेडिकलप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रायगडनगर भागातील बळीराम पाटील शाळेजवळ ही घटना घडली. चोरट्यांनी शटर उचकटण्यासाठी कोणतेही टूल किंवा रॉड न वापरता, चार जणांनी एकाच वेळी ताकद लावून शटर ओढून पुढे सरकवले व आत प्रवेश केला. या टोळीने शिवा मेडिकलचे कुलूप तोडून ३५ हजार आणि लगतच्या न्यू अंश मेडिकलमधून ६ हजार रुपये अशी ४१ हजारांची रोकड लांबवली. याशिवाय आणखी एक मेडिकल शॉप फोडण्यात आले आहे.
या तिन्ही मेडिकलच्या मध्ये किराणा, जनरल स्टोअर्स, आईसक्रीम शॉप अशी ५ ते ६ दुकाने होती. तेथेही रोकड असण्याची शक्यता असताना चोरट्यांनी त्यांना हातही लावला नाही. केवळ मेडिकल दुकानांनाच टार्गेट केले. त्यामुळे कामावरून काढलेल्या अथवा काम न दिलेल्यांनी हे कृत्य केले असावे. या दिशेने सिडको पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारसह ४ संशयितांचा शोध सुरू आहे.
गारखेडा परिसरात दोन घरांतून लाखोंचा ऐवज पळला
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन घरांतून चोरट्यांनी सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज पळवला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेशनगर येथील विजया लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा जितेंद्र नागरे (२७) यांच्या घरात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान घरफोडी झाली.
चोरट्याने कपाटातून ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण, २० हजार रुपयांचे कानातले दागिने, सोन्याची ठुसी, सोन्याची पोत असा सुमारे ९२ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवला तर दुसऱ्या घटनेत शवंतनगर परिसरातील पुष्कराज मुकुंदराव चौधरी (३५) यांच्या घरातून ७ ऑगस्ट रोजी पहाटे १ ते सकाळी ६ वाजेदरम्यान बेडरूममधील कपाटातून ५ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किमतीच्या असा ऐवज पळवला. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालार राठोड आणि डोंगरे करीत आहेत.