Chhatrapati Sambhajinagar Fraud Case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Fraud Case : भविष्य सांगतो' म्हणत भामट्याने ग्रामपंचायत शिपायाला लुबाडले

मोंढा नाका परिसरातील घटना; तोतया पोलिसांनंतर लुबाडण्याचा नवा फंडा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका भामट्याने ग्रामपंचायत शिपायाला हातचलाखीने ५ ग्रॅमची अंगठी, १६०० रुपये रोख लुबाडल्याची घटना रविवारी (दि.२१) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोंढा नाका परिसरात घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश नागोराव कुटेकर (५६, रा. कडेठाण, ता. पैठण) हे कडेठाण ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते मध्यवर्ती बसस्थानकात उतरून रिक्षाने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोंढा नाका सिग्नल येथे गेले. कांचन स्टील दुकानासमोरून रविवारच्या बाजाराकडे पायी जात होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले. 'मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो, तुमचे दोघा नवरा-बायकोचे पटत नाही, मी तुमचे टिपण बसवून देतो', असे म्हणत भामट्याने कुटेकर यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्याने कुटेकर यांना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि खिशातील पैसे काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. कुटेकर यांनी ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १६०० रुपये रोख असा ऐवज काढून रुमालात ठेवला. भामट्याने हातचलाखी करत हा रुमाल गुंडाळून कुटेकर यांच्या पँटच्या खिशात ठेवल्याचे भासवले. त्यानंतर आरोपीने कुटेकर यांच्या हातात एक खडा दिला आणि 'थोडे समोर लिंबाच्या झाडाखाली गेल्यावर तो खडा खाली टाकून श्रीराम, असे देवाचे नाव घ्या', असे सांगितले.

कुटेकर यांनी पुढे जाऊन खडा खाली टाकला आणि खिशातील रुमाल काढून पाहिला असता त्यात अंगठी आणि पैसे नव्हते. आपली हातचलाखीने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास हवालदार मोहम्मद इरफान करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT