Daulatabad : आगीत लाखमोलाची वनसंपदा खाक file photo
छत्रपती संभाजीनगर

Daulatabad : आगीत लाखमोलाची वनसंपदा खाक

अब्दिमंडी येथील डोंगर परिरातील घटना, ऐन उन्हात वन्यजीवांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

Forest resources worth lakhs destroyed in fire

दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा :

दौलताबादच्या उत्तर बाजूस मोमबत्ता तलावाच्या परिसरातील अब्दिमंडी येथील डोंगराला गुरुवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत लाखमोलाच्या वनस्पती जळून खाक झाल्या असून, अनेक सरपटणारे प्राणी, लहान वन्यजीव आणि पक्ष्यांची घरटी नष्ट झाली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात व्यक्तीने जळती विडी किंवा सिगारेट टाकल्यामुळे आग लागली असावी. सुरुवातीला लहान प्रमाणात असलेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरत जाऊन काही वेळातच उग्र रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच खुलताबाद वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधीर धवन, वनरक्षक पुरुषोत्तम वायाळ, मयूर चौधरी, प्रभुदास हजारे, विनायते आणि विजय चौहान यांनी भर उन्हात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. जोरदार वारा, डोंगराच्या कपारी आणि वाळलेली झाडे यामुळे आग विझवण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

अग्निशमनासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लोअर मशीनचे वजन सुमारे १० ते १५ किलो असल्याने ती खांद्यावर घेऊन उंच डोंगराळ भागात पोहोचणे कठीण ठरत होते. काही दुर्गम भागात पोहोचणे अशक्य झाल्याने झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे काम करण्यात आले. वनपाल सुधीर धवन यांनी सांगितले की, खुलताबाद वनपरिक्षेत्रात आग विझवण्यासाठी १० ते १२ ब्लोअर मशीन उपलब्ध आहेत. मात्र डोंगराच्या कपारीत पोहोचणे अवघड असल्याने मानवी मर्यादा येतात. सुमारे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

विशेष म्हणजे, याच डोंगराच्या पूर्व भागात मागील महिन्यात (दि. २९ मार्च) देखील आग लागली होती, तीही रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून नियंत्रणात आणण्यात आली होती. या घटनेमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले असून, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या घटनांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT