Five cattle rescued while being taken for slaughter
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोरक्षक आणि गंगापूर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील कायगाव शिवारात बुधवारी (दि.११) पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या कारवाईत पाच गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईत कॅरी वाहन (एमएच २० ईएल ३०१२) पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सु ४.४५ वाजता सपोनि विनायक पाटील आणि पोलिस कॉन्स्टेबल अनिरुद्ध शिंदे हे कायगाव शिवारात गस्तीवर होते. यावेळी संशयास्पदरीत्या जात असलेले एमएच २० ईएल ३०१२ क्रमांकाचे कॅरी वाहन त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये पाच गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने तातडीने कारवाई करून पाचही जनावरांची सुटका केली. पुढील सुरक्षिततेसाठी या गोवंशीय जनावरांना गोकुळधाम गोशाळेत दाखल करण्यात आले. या प्रकरणी दानियल मुजिब शेख (रा. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल अनिरुद्ध शिंदे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलिस करीत आहेत.
संशयास्पद पहाटेची वाहतूक पोलिसांच्या नजरेत
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद वाहनाची वेळीच तपासणी केल्याने गोवंशाची अवैध वाहतूक उघडकीस आली. पोलिस आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पाच गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका झाली.