Illegal sand mining ... अखेर 'त्या' अवैध वाळू साठ्यावर महसुलची कारवाई file photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal sand mining ... अखेर 'त्या' अवैध वाळू साठ्यावर महसुलची कारवाई

पुरणगावातील १२७ ब्रास वाळू जप्त; गोदा पात्राकडे जाणारा रस्ताही बंद

पुढारी वृत्तसेवा

... Finally, Revenue Department takes action against 'that' illegal sand stockpile

नितीन थोरात

वैजापूर : तालुक्यातील अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि साठेबाजीबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासन अखेर कारवाईला सरसावले आहे. पुरणगाव येथील गट क्रमांक २५१ मधील तब्बल १२७ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला तसेच गोदावरी नदीपात्राकडे जाणारा रस्ताही जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून बंद करण्यात आल्याने अवैध वाळू साठा करणाऱ्यांचे धाबे दणादले आहेत.

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात नागरिकांनी अवैध वाळू साठ्यांचे पुरावे सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर दैनिक पुढारीने महसूल-पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांचा धुडगूस या मथळ्याखाली सलग वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने पहिली कारवाई केल्याची माहिती मंडळ अधिकारी संजय शिंदे यांनी दिली. मात्र, तालुक्यातील बाभुळगाव, भालगाव, डांगपिंपळगाव, अव्वलगाव आदी ठिकाणांवरील अवैध साठ्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे.

दरम्यान, प्रशासन हालचाल करत असल्याची माहिती मिळताच काही ठिकाणचे वाळू साठे रातोरात स्थलांतरित करण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दुसरीकडे कारवाईनंतरही वाळू तस्करी थांबलेली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाची ही कारवाई केवळ दिखाऊ ठरणार की व्यापक मोहीम उभी राहणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

वीरगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यासह वैजापूर पोलिस ठाण्यातील दुसरा कर्मचारी आणि एका तलाठ्याने कथितरीत्या वाळू तस्करीत भागीदारी केल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. त्यामुळे अवैध वाळू व्यवसायाला संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

पुरणगावात कारवाई; इतर गावांत ढीग कायम

पुरणगावातील अवैध वाळू साठ्यावर मध्यरात्री कारवाई करून रस्ता बंद करण्यात आला. मात्र बाभुळगाव, अव्वलगाव, भालगाव, डांगपिंपळगाव तसेच शहर परिसरातील इतर मोठ्या साठ्यांकडे प्रशासनाने अद्याप दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी वाळूचे ढिग कायम असून काही साठे स्थलांतरित झाल्याची माहितीही समोर येत आहे. मग कारवाई केवळ एका गावापुरतीच मर्यादित का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

एका ठिकाणचा अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. पुरणगाव येथे नदीकडे जाणारा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून बंद करण्यात आला आहे. इतर ठिकाणांबाबत माहिती घेतली जात आहे.
एकनाथ बंगाळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी, वैजापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT