Farmers suffer due to interrupted power supply
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील आमठाणा परिसरात कमी दाबाचा व वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे रब्बी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत असून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
रब्बी हंगामासाठी महावितरणकडून दिवसा व रात्री अशा दोन पाळीत वीजपुरवठा केला जातो. मात्र दिवस पाळीत कमी दाबाने व वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी अक्षरशः त्रस्त झाला आहे. यावर्षी तालुक्यात पावसाच्या मेहेरबानीमुळे छोटे-मोठे जलसाठे तुडुंब भरलेले आहे. तर विहिरींना मुबलक पाणी असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र शेतकऱ्यांना मात्र पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगाम जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
महावितरणने वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी साहेबराव वाघमोडे, कारभारी शिंदे, कबीरचंद भोपळे, गजानन खादवे, शे षराव शिंदे, आजिनाथ शिंदे, धरमचंद भोपळे, देवीनाथ भोपळे, भगवान काथार, देविदास शिंदे, फुलाबाई भोपळे, रघुनाथ वाघमोडे, सुभाष बखळे, साहेबराव दांडगे, विजय पगार आदी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला
महावितरणचे दुर्लक्ष
तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. अनेक शिवारात बिबट्या दिसून आला. यामुळे रात्र पाळीला पिकांना पाणी देणे जिकरीचे झालेले आहे. दिवसा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची वेळ आली आहे