औसा (छत्रपती संभाजीनगर) : भर उन्हाळ्यात मे महिन्यात बरसलेल्या पावसाने मात्र पेरणी होताच गेल्या महिन्यापासून दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
माना टाकत असलेल्या कोवळ्या पिकांना जगवण्यासाठी शेतकरी पावसाळ्यात स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. परिणामी, परिसरातील पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
औसा तालुक्यातील भादा, मातोळा, उजनी, गुबाळ, आलमला, लामजना, खरोसा, किल्लारी व हासेगाव आदी परिसरात पेरणीनंतर गेल्या एक महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्यातच आलेल्या पावसामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला. यातच सध्या सुरू असलेल्या कुंभारी वाऱ्यामुळे व दुपारी पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे.
यामुळे नुकतीच उगवलेली कोळी पिके माना टाकत असल्याचे दिसत आहे. मे महिन्यातील पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले होते. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली होती. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी याचा फायदा घेऊन स्प्रिंक्लरद्वारे कोवळ्या पिकांना पाणी देऊन जीवदान देण्यासाठी धडपड करत आहेत. चार-आठ दिवस अशीच परिस्थिती राहिली तर अनेक ठिकाणची पिके वाळून जाण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आणि खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्यानंतर गेल्या २४ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसामुळे कोवळी पिके जगवण्यासाठी शेतकरी भर पावसाळ्यात स्प्रिंकलरचा आधार घेत आहेत. मे महिन्यातील पावसामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आले होते. त्यामुळे पाणीपातळीत थोडीफार वाढ झाली होती. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी याचा फायदा घेऊन स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला संजीवनी मिळाली असून, उसाची अंतर्गत मशागत करण्यात शेतकरी सध्या व्यस्त आहेत. अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला संजीवनी मिळाली असून, तालुक्यातील दोन कारखान्याच्या क्षेत्रातील उसाच्या अंतर्गत मशागतीत शेतकरी सध्या व्यस्त आहेत.