पिशोर ः परिसरातील एका शेतात ऊस लागवड करताना शेतकरी, मजूर.  ( छाया- कारभारी हराळ)
छत्रपती संभाजीनगर

Sugarcane Farming : कापूस, मका पिकांना भाव नसल्याने ऊस लागवडीकडे कल

जवखेडा परिसरातील चित्र, ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत

पुढारी वृत्तसेवा

पिशोर : पारंपरिक पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. परिसरातील शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळताना दिसत आहेत. कापूस व मका या प्रमुख पिकांमुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून उसाची निवड केली आहे. सध्या गाव परिसरात जवळपास 25 एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली असून आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून शेती केली जात आहे.

गत काही वर्षांपासून कापूस व मका पिकांच्या लागवडीचा खर्च सातत्याने वाढत आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यातच बाजारपेठेत या पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी तुलनेने स्थिर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी आता ऊस लागवडीला प्राधान्य देत आहेत.

सध्या उसाच्या बेण्याला सुमारे पाच हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून लागवडीसाठी एकरी सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मात्र, भविष्यात चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आणि साखर कारखान्यांकडून उपलब्ध होणारी हमी, बाजारपेठ लक्षात घेता शेतकरी ऊस लागवडीचा निर्णय घेत आहेत.

परिसरातील अनेक शेतकरी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ठिबक सिंचनाद्वारे ऊस लागवड करत आहेत. या पद्धतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून खत व्यवस्थापनही सुलभ होत आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

जवखेडा बु. परिसरातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेतीत विविध प्रयोग सुरू केले आहेत. योग्य नियोजन, वेळेवर सिंचन व खत व्यवस्थापन केल्यास ऊस पीक फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे ग््राामीण भागातील शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कापूस व मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT