Farmers' organization's road blocked in struggle against poor roads
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पिसादेवी ते पळशी फाटा (आंबेडकर चौक ते पळशी फाटा) या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेल्या अपघातात राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील व ग्रामपंचायत सदस्य मदन काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उदयराज गायकवाड, उपाध्यक्ष शुभम देशमुख, राहुल मते, योगेश शिंदे, अनिकेत काळे, देवराज बचके, छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे पिंपळे महाराज, दिनेश देशमुख यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन देऊन रस्त्याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी, दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई, मंजूर अंदाजपत्रकानुसार रस्ता नव्याने बांधणे, राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत आणि तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी दिला