Farmers in triple crisis, fear of unseasonal weather
पिशोर, पुढारी वृत्तसेवा : सुरुवातीला अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिकांना फटका बसलाच होता, त्यात गत महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली. आता कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडले आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीच्या वेचणीला वेग देण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत; परतीच्या पावसामुळे मका तसेच कपाशी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतांमध्ये फुललेला कपास शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवतोय; परंतु ढगाळ वातावरण कायम राहिल्यास अवकाळी पावसाने हा कापूसही हातचा जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचा फैलाव वाढत असून, त्यामुळे पहिल्या दुसऱ्या वेचणीतच पीक संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्याची शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मजूर टंचाईमुळे काम ठप्प
अव्वाच्या सव्वा मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर बोलवावे लागत आहेत. मात्र प्रवासाच्या सोयीसुविधा, वाहनातील जागा, सुरक्षितता या बाबी पाहूनच मजूर कामावर येण्यास तयार होत आहेत. परिणामी मजुरांचा सर्वत्र शोध घेण्याची वेळ शेतमालकांवर आली आहे.