Farmers' Diwali in darkness, when will they get help?
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत दिवाळी आधी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र मदत तर दूरच नुकसानीच्या पूर्ण झालेल्या याद्या तहसील कार्यालयात पडून आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या मदतीचा जीआर (शासन निर्णय) अद्याप आलेला नाही. त्यामुळे याद्या अपलोड करण्याचे काम रखडले असून, मदत मिळणार कधी ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ८२ हजार २३५ शेतकऱ्यांचे ८१ हजार २४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात ८० हजार ६१२ हेक्टर जिरायती, ३५० बागायती, तर ६१ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाच्या निकषानुसार मदतीसाठी ६९ कोटी २५ लाखांची गरज आहे. तशा याद्या व मदतीच्या रकमेचा अहवाल महसूल प्रशासनाकडे तयारही आहे. जीआर प्राप्त होताच याद्या व मदतीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. तालुक्यात प्रशासनासह आजी माजी लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी फिरून नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या सूच नेनुसार पंचनामेही केले. पंचनामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा मदतीकडे लागल्या होत्या.
दिवाळी आधी मदत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शासनाकडून जीआर प्राप्त न झाल्याने मदत तर दूरच अद्याप याद्याच अपलोड झालेल्या नाही. यामुळे शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली असून, मदतीकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते. अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हताश झाला आहे. शासनाने मदतीसह कर्जमाफी देणे गरजेचे होते. मात्र हे सरकार शेतकरी विरोधी असून, अद्याप नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.
भास्कर घायवट, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, सिल्लोड
सरकारने मोठमोठ्या वल्गना करत मदतीचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल, अशी शाश्वती दिली. प्रत्यक्षात मात्र मदतीचा जीआरच अद्याप पोहोचलाच नाही. हा प्रकार बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे. महायुती सरकारने केली शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षांची होळी, बळीराजावर आणली काळी दिवाळी.प्रा. राहुलकुमार ताठे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते. अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हताश झाला आहे. शासनाने मदतीसह कर्जमाफी देणे गरजेचे होते. मात्र हे सरकार शेतकरी विरोधी असून, अद्याप नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.भास्कर घायवट, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, सिल्लोड