परभणी : जिल्ह्यातील पूर्णा, परभणी, सोनपेठ तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस तीव्र विरोध होतांना दिसून येत आहे. मंगळवारी तालुक्यातील पोखर्णी (नृ.) फाटा, उखळद, बाभळी येथे संयुक्त मोजणीसाठी भूसंपादन अधिकारी व महसूलचे अधिकारी, कर्मचारी आले असतांना शेतकऱ्यांनी जोरदार घो षणाबाजी करत संयुक्त मोजणी उधळून लावली. हिंगोलीतही शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ३० गावांमधून नियोजित शक्तिपीठ महामार्ग जाणार असुन दिड हजार एकर जमीन संपादीत होणार आहे. जवळपास २० हजार कोटी रुपयांचा मावेजा जाहीर करण्यात आला आहे. असे असतांनाही महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतांना दिसून येत आहे. जमिनीचा तुकडा गेल्यानंतर खायचे काय आणि लेकरा बाळांचे पालन पोषण कसे करायचे असा सवाल शक्तिपीठ बाधित महिला व पुरूष शेतकरी उपस्थित करत आहेत.
महामार्गला जमिन संपादीत झाली तर अनेकजन भुमीहीन होणार आहेत. मंगळवारी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह फाटा येथे भूसंपादन अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, मोनार्च कंपनीचे कर्मचारी पोहचले असतांना शेतकऱ्यांनी जोरदार घोषणााजी केली. एकच जिद्द - शक्तिपीठ रद्द, जमिन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषना देत महामार्गासाठीची संयुक्त मोजणी उधळून लावली. यावेळी दत्ता वाघ, गजानन गायकवाड, अर्जुन जोरवर, मुंजा इसनर, दशरथ भुसनर, विजय बेले, शांतीभुषन कच्छवे, प्रभाकर नाईक, अनिल नाईक, उमाकांत यानपल्लेवार, गिरीष यानपल्लेवार, विशाल झरकर, विजय झरकर, गोपाळ कच्छवे, आनंता बेले, उर्मिला जोरवर,हेमंत कांबळे, मनोज झरकर, गजानन झरकर, हनुमान जोरवर, बेंबडे, विठ्ठल गरुड यांच्यासह बाधित शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
गुंज येथील शेतकरी आक्रमक झाले असून जमीन हवी असेल तर आमच्या बळी घ्यावा लागेल मगच जमीन मिळेल असा निर्वाणीचा इशारा देत मंगळवारी मोजणीचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना रोखले. त्यानंतर उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदन सादर केले.
शक्तिपीठ महामार्गाला आमचा कायम विरोध असून आम्ही आमच्या सुपीक जमीनी देणार नाही अशी आक्रमक भूमिका शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी घेतली जात आहे. सुपीक जमिनी देणार नाही असा पंचनामा संयुक्त मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून करवून घेतल्या जात आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना मुख्यमंत्री शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास का धरत आहेत. असा सवाल ही शेतकरी उपस्थित करत आहेत