फर्दापूर : प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देत दाटीवाटीने गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनावर फर्दापूर पोलिसांनी कारवाई करत सहा बैलांसह आयशर वाहन जप्त केले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील ठाणा फाटा येथे शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाला सोयगाव येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे.
या प्रकरणी पो.अ फिरोज तडवी यांच्या फिर्यादीवरून अल्ताफ शेख सत्तार काकर (वय ४२, रा. बोखरी, पो. वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ताफ शेख हा आयशर वाहन (एमएच १९ एस ७८६१) मधून सहा गोवंश बैलांची वाहतूक करत होता. वाहनात बैलांना अत्यंत दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. तसेच त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
बैलांच्या उंची व रुंदी नुसार हालचालीसाठी आवश्यक जागा नसताना त्यांना आखूड दोऱ्यांनी बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिणामी पोलिसांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचे सहा बैल, ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन तसेच १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.