छत्रपती संभाजीनगर : शहरात तोतया पोलिसांनी धुमाकूळ घालून खऱ्या पोलिसांना जेरीस आणले आहे. पोलिस असल्याची थाप मारून अनेकांना गंडवण्याच्या घटना घडत असताना तोतया पोलिस मात्र खऱ्या पोलिसांना जेरीस आणत आहेत. नुकताच अशीच घटना सिडको एन-३ भागात घडली. एका ६७ वर्षीय वृद्धेचे तब्बल ९ तोळ्यांचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना जैन मंदिरासमोर घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामी विवेकानंदनगर येथील रहिवासी श्रीकंवरबाई इंदरचंदजी लुंकड या नेहमीप्रमाणे सोमवार (दि.११ मे) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जैन मंदिरातून दर्शन घेऊन पायी घरी परतत होत्या. छत्रपती कॉलेजसमोरील एका ड्रायक्लिनर जवळ येताच, दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना रोखले.
पोलिस असल्याचे भासवून ओळ खपत्रही दाखवले. या भागात चोऱ्या वाढल्या आहेत, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा अशी थाप मारली. तेल लावून काढले दागिने वृद्धेने हातातील सोन्याच्या पाटल्या काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या निघत नव्हत्या. अशातच या भामट्यांनी वृद्धेच्या हाताला खोबरेल तेल लावून सहा तोळ्यांच्या पाटल्या, गळ्यातील २ कंठी चेन आणि सोन्याच्या अंगठ्या असा ९ तोळ्यांचा ऐवज काढून घेतला. दागिने पिशवीत ठेवताना एका भामट्याने ते कागदात गुंडाळण्याचा बहाणा केला.
तुम्हीच बघत बसा
वृद्धेला शंका आल्याने तिने दागिने दाखवा असे म्हणताच त्या भामट्यांनी तुमचे तुम्ही बघत बसा असे उद्धट उत्तर देऊन दोन्ही भामटे दुचाकीवरून पसार झाले. ते जाताच वृद्धेने पुडी उघडून पाहिली असता, समोर तांबे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.