छत्रपती संभाजीनगर : बोगस आयएसएस कल्पना भागवत यांच्याकडे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सचिवांचे बोगस पत्र सापडले असून, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडी असल्याचे सांगणारा डिंपी हरजाईच्या मदतीने बड्या असामींकडून दोघांनी वेगवेगळी आश्वासने देऊन मोठ्याप्रमाणात पैसे उकळले असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून या जोडीने दिल्लीत डेरा टाकला होता. कल्पना भागवत स्वतःला आयएएस असल्याचे सांगून दिल्ली येथे राज्यातील अनेक नेत्यांच्या संपर्कात होती. दरम्यान, तिने काहींना आयएएस अधिकारी असल्याचे सांगून ठगबाजी केली.
कल्पना भागवतकडे केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांच्या नावाने बनावट पत्रही आढळले आहे. तिने अधिकारी असल्याचे सांगून डिंपी हा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडी असल्याचे सांगून अनेक नेत्यांनाच चंदन लावले. तिच्याकडे बोलण्याची कसब असल्याने कोणीही सहज तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होता. राज्यातील अनेक नेत्यांना ती दिल्ली येथे सातत्याने भेटायची. विश्वास संपादन करून विविध योजना, निधी मिळवून देण्याची थाप मारून पैसे उकळत होती. दरम्यान, तिला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण यांनीही तिला आयएएस म्हणून चांगले कार्य करत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यावरून त्यांची मंगळवारी सिडको पोलिसांनी चौकशी करून जबाब घेतला होता. त्यात त्यांच्याकडूनही तिने पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिचे आणखी अनेक कारनामे पोलिस तपासात उघड होत असून, ती या फसवणुकीच्या प्रकरणात आणखी खोलवर गुंतलेली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दोन डीसीपींसह चार निरीक्षक करणार चौकशी
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे डीपीसी रत्नाकर नवले, परिमंडळ दोनचे डीसीपी प्रशांत स्वामी, गुन्हे शाखाचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सायबर ठाण्याचे सोमनाथ जाधव, सिडकोचे अतुल येरमे, हसूलच्या स्वाती केदार या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी मंगळवारी आणि बुधवारी दिवसभर आरोपींची कसून चौकशी केली. तसेच आयबी आणि एटीएस सातत्याने सिडको ठाण्यात तळ ठोकून आहेत.
पाकिस्तानात फोनाफोनीचे गूढ कायम
कल्पनाचा मित्र अशरफचा भाऊ यामा हा सध्या पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे राहतो. त्याला भारतात प्रवेश मिळवून देण्यासाठी कल्पनाने व्हिसासाठी मोठा खटाटोप केला. त्याचे पाकिस्तानातील रेस्टॉरंटवर कारवाई झाल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी तिने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना फोनाफोनी केली. त्यांच्यात काय बोलणे झाले याचे गूढ अद्यापही कायम आहे. तिने ३ लाख रुपये हवालामार्फत अशरफच्या दिल्ली येथील मित्राच्या मदतीने पाकिस्तानात पाठवल्याचे तपासात उघड झाले होते.
मी खोटे काम केले नाही: कल्पना भागवत
पोलिस कस्टडीत असलेल्या कल्पना भागवतने सिडको पोलिस ठाण्याच्या बाहेर बुधवारी (दि. ३) माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तिच्यावर पद्मश्री मिळवून देण्याच्या बदल्यात नेत्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपांबाबत विचारणा केली असता ती म्हणाली की, पद्मश्री मिळवून द्यायला मी एवढी मोठी असामी नाही. नेत्यांनी पैसे दिले असे नाही. नागेश आष्टीकर हे माझे दादा आहेत. त्यांनी मला मदत केल्याचा दावा तिने केला आहे. तसेच मी कोणतेही खोटे काम केलेले नाही. जे काही आरोप झालेत त्यावर मी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचेही तिने सांगितले. अशरफ हा अफगाणचा असून, तो माझा मित्र आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडी असलेला डिम्पी हरजाई हा अभिषेक चौधरी असल्याचेही ती सांगते. १९ कोटींचा चेक व्हॉट्सॲपवर आलेला असून, त्याबाबत तिने अधिक काही सांगितले नाही.