Sambhajinagar land registry scam pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar land registry scam : बोगस रजिस्ट्री प्रकरण : पाचवी पास हबीबला दाखवायचे कोट्यवधींच्या जमिनीचा मालक

दस्तनोंदणीसाठी टोळीकडून मिळायचे ५० हजार; रजिस्ट्री कार्यालयात आरोपीची परेड

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : रजिस्ट्री कार्यालयात बनावट आधार कार्डचा वापर करून आणि ऑनलाईन प्रणालीला बायपास करून कोट्यवधींच्या जमिनींची 'ऑफलाईन' बोगस रजिस्ट्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य तोतया आरोपी हबीब सालेह हबीब अहमद (रा. मालेगाव, सध्या रा. महमुदपुरा) याला पोलिसांनी थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन नाट्यमयरीत्या गुन्ह्याचा पंचनामा केला.

हिरापूर येथील २ हेक्टर ११ आर शेतजमिनीचे मूळ मालक अली असगर पेटीवाला यांच्याऐवजी हबीबला तोतया मालक म्हणून उभे करून बनावट 'हिबानामा' करण्यात आला होता. हबीब हा केवळ पाचवी पास असून, त्याला नीट लिहिता-वाचताही येत नाही. मात्र भूमाफिया आणि मुख्य एजंट अब्दुल काशिद ऊर्फ जुनेद याच्या संपर्कात आल्यानंतर तो या टोळीचा मुख्य मोहरा बनला.

५० हजार रुपयांच्या मोबदल्यात तो कोट्यवधींच्या जमिनींचा मालक म्हणून निबंधक कार्यालयात उभा राहायचा. त्याने आतापर्यंत ७ ते ८ वेळा असाच बनाव केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. या महाघोटाळ्यात आतापर्यंत मोहंमद नूर, एजंट जुनेद खान, तोतया हबीब आणि बनावट आधार कार्ड बनवून देणारा झेरॉक्स चालक शोहेबखान सादुल्लाखान अशा चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

रजिस्ट्री कार्यालयात काय घडले ?

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी हबीबला थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. २७ मे रोजी दस्त नोंदणी करताना तिथे नेमके काय घडले, तो कुठे उभा होता आणि कोणत्या अधिकाऱ्यांसमोर त्याने अंगठा लावला, याची साखळी उलगडण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्ह्याचे 'सीन रिक्रिएशन' केले. या गैरव्यवहारात कार्यालयातील कोणते अधिकारी व कर्मचारी सामील आहेत, याचाही तपास निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सचिन देशमुख व अभिजीत गायकवाड यांचे पथक करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT