व्हिएतनामशी असणारे सांस्कृतिक अनुबंध मजबूत करण्याचे प्रयत्न pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Vietnam relations : व्हिएतनामशी असणारे सांस्कृतिक अनुबंध मजबूत करण्याचे प्रयत्न

अजिंठा, वेरूळ लेण्यांकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्याकडे लक्ष देणार

पुढारी वृत्तसेवा

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : व्हिएतनामशी असणारे सांस्कृतिक अनुबंध अधिक मजबुत करण्याच्या दिशेने राज्य सरकार पावले उचलत असून, अलिकडेच मुंबईत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिंठा, वेरूळ लेण्यांचा संदर्भ देत गुंतवणुकीचे आवाहन व्हिएतनामनला केले आहे.

चीन आणि जपाननंतर सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणारा देश म्हणून व्हिएतनामची ओळख आहे. गेल्या पन्नास वर्षापासून भारत आणि व्हिएतनाम सांस्कृतिक नात्यांची विण अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो लाम यांच्याशी संवाद साधताना जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथील बौद्ध लेण्यांचा उल्लेख केला. तसेच छत्रपती संभाजीनगर येथून थेट व्हिएतनामची राजधानी हो चि मिन्ह सिटी पर्यत थेट हवाई सेवा सुरू करण्यासह स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

याबाबत बोलताना पर्यटना तज्ञ आणि इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. राजेश रगडे म्हणाले, व्हिएतनामची सांस्कृतिक नाळ भारतातील बुद्ध भूमीशी जोडलेली आहे. त्यामुळे त्या देशातील जनतेचा ओढा भारताकडे असणे साहजिक आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे अजिंठा, वेरूळ, संभाजीनगरच्या बुद्ध लेणीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतील. व्हिएतनामची खाद्य संस्कृती व भाषा अवगत करून चांगल्या सुविधा दिल्या तर प्रगतीला मोठा वाव मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

इ.स. दुसऱ्या शतकाच्या अखेरीस, व्हिएतनाम हे महायान बौद्ध धर्माचे एक प्रमुख प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित झाले होते. चीनला जाणाऱ्या मार्गावर अनेक भारतीय बौद्ध धर्मप्रसारक भिक्खुसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण होते. हे भिक्खु भारतीय व्यापाऱ्यांनी वापरलेल्या भारतीय उपखंडातून चीनपर्यंतच्या सागरी व्यापारी मार्गाचा अवलंब करत असत. तेथे बेचाळीस अध्यायांचे सूत्र आणि आनापानस्मृती-सूत्र यासह अनेक महायान सूत्रे आणि आगमांचे अभिजात चीनी भाषेत भाषांतर केले गेले, असा इतिहासातील दाखला आहे.

गृहविभागाकडे प्रस्ताव

चिकलठाणा विमानतळावर इमीग्रेशन चेक पोस्ट चा सर्वे झाला आहे. हा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरी साठी प्रलंबित आहे.या प्रस्तावाला मंजुरी मिळताच येथून व्हिएतनामला विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या बाबत हालचाली सुरू असून लवकच ही विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती विमानतळ प्रमुख शरद येवले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT