Arrested in bribery case
१ लाखाच्या लाचप्रकरणी दोघांना अटक  Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : १ लाखाची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक 'ACB'च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी साडेतीन लाख रुपये लाच मागणी करून आधी दोन लाख रुपये घेतले. उर्वरित दीड लाख रुपयांपैकी एक लाख रुपये लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता (वर्ग १) आणि उपव्यवस्थापक (वर्ग २) यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १०) कन्नडमध्ये ही कारवाई केली, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली. कार्यकारी अभियंता धनाजी रघुनाथ रामुगडे (वय ५४, रा. चंद्रलोक नगरी, कन्नड), उपव्यवस्थापक प्रवीण कचरू दिवेकर (रा. चिनार गार्डन, पडेगाव), अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आरोपी लोकसेवक रामुगडे व दिवेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी करून यापूर्वी दीड लाख रुपये घेतलेले असून उर्वरित दोन लाख रुपयांपैकी तडजोड करून १ लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार याने लाचलुचपत कार्यालयात धाव घेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपतने आज (बुधवारी) सापळा रचून कन्नड येथील महावितरणाच्या कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता कक्षात लोकसेवक धनाजी रामुगडे व प्रवीण दिवेकर या दोघांना १ लाखाची लाच स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.त्यांच्यावर कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

SCROLL FOR NEXT