Excitement for the academic year begins in municipal schools today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधत महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी (दि. १५) विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. यासह पाठ्यपुस्तके, गणवेश आणि मिठाईचेही वितरण केले जाणार आहे. शहरातील सर्व ५० महापालिका शाळांमध्ये यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या १८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी गेल्या काही दिवसांपासून शाळास्तरावर विविध तयारी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वर्गखोल्या, शाळा परिसर, बाके आणि अन्य सुविधांची विशेष स्वच्छता करण्यात आली.
शाळा परिसर आकर्षक व प्रसन्न दिसावा यासाठी आवश्यक सजावटही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पालक अधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारीही विविध शाळांना भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून नव्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. यंदाचा मुख्य स्वागत समारंभकेंद्रीय प्राथमिक शाळा, नारेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी शाळांमध् रविवारी घेतला. यावेळी किराडपुरु क्रमांक-१सह विविध शाळांना भेट देत आवश्यक सूचना करण्यात आल्या. महापालिकेच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण पद्धती आणि विद्यार्थीकंद्रित उपक्रमांमुळे पालकांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी प्रवेशसंख्येतही वाढ होत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पहिल्याच दिवशी आनंदाची भेट
नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. यासोबतच मोफत पाठ्यपुस्तके, गणवेशांचे वितरण आणि मध्यान्ह भोजनासह मिठाई देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
महापालिका शाळांकडे वाढतोय पालकांचा कल
डिजिटल वर्गखोल्या, सुसज्ज शैक्षणिक साधने, क्रीडा साहित्य, सांस्कृतिक उपक्रम आणि सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्थेमुळे महापालिका शाळांची प्रतिमा उंचावली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याने पालकांचा या शाळांकडे कल वाढत आहे.