Sambhajinagar News : टँकरवाल्यांनी आकारले अवाच्या सव्वा दर File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : टँकरवाल्यांनी आकारले अवाच्या सव्वा दर

पाणीपुरवठा विस्कळीतच : अनेक भागांत बारा ते पंधरा दिवसांपासून निर्जळी

पुढारी वृत्तसेवा

Excessive water rates charged by tankers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतरही शहराचा पाणी पुरवठा विस्कळीतच असल्याने शहरवासीयांना टँकरचा सहारा घ्यावा लागत आहे. मात्र टँकर चालकांकडून वाढीव दर आकरले जात असून पाण्याविना नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहराच्या अनेक भागांत गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून पाणी आलेले नसल्याने महापालिकेविरोधात नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे. शहरासाठी करोडे रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. त्यानंतरही आजही अनेक भागांना दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचे कोलमडलेले वेळापत्रक अद्यापही पूर्व पदावर आलेले नसून शहरातील अनेक भागांत रविवारी (दि.२०) निर्जळीच असल्याने नागरिकांना टँकरचा सहारा घ्यावा लागला.

मात्र टँकरचालकांकडून अवाच्या सव्वा दर आकरण्यात येत असून छोट्या टँकरसाठी ७०० ते ८०० रुपये तर मोठ्या टँकरसाठी १५०० ते १७०० रुपये आकरले जात आहे. दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मिलीमिटर व्यासाची जलवाहिनी बुधवारी (दि. १६) चितेगाव जवळ फुटली होती. या जलवाहिनीच्या दुरुस्तीला तब्बल २३ तासांचा अवधी लागला. त्यामुळे गुरुवारी (दि. १७) दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर शहराच्या दिशेन पाणी झेपावले. मात्र, या २३ तासांच्या खंडामुळे मनपाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले.

यापूर्वी दोन दिवस अगोदर १४ जुलै रोजी फारोळा येथील पंपहाऊसच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाला. त्यामुळे सहा तास पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद पडली. त्याचा परिणाम म्हणून शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले होते. तेव्हापासून विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा अद्यापही पूर्वपदावर आलेले नाही.

पाण्यासाठी नागरिक हैराण

पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असून त्यामुळे शहरावर पाण्याचे संकट निर्माण होत आहे. शहरातील अनेक भागांत गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. यावर महापालिकेकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसून पाण्याविना नागरिक हैराण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT