Encroachment removal campaign temporarily suspended: MP Sandipan Bhumre
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या अतिक्रमणाची पाडापाडी तूर्त तरी मी थाबंविली असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र ठरवून दिलेल्या सीमाकंन रेषेच्या पलीकडे कुणीही जाऊ नये, असे खासदार संदीपान भुमरे यांनी बुधवारी (दि.३) वाळूज येथे सांगत नागरिकांना दिलासा दिला.
वाळूज गणेश महासंघाच्या कार्यालयात बुधवारी खा. भुमरे यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर भागाचा विकास झपाट्याने होत आहे. या भागात मोठमोठे उद्योग येणार आहेत. आपल्या भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबध्द आहे. त्या माध्यमातूनच वाळूजच्या हनुमान मंदिर बांधकामासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहे. मात्र काम कसे करायचे ते आपल्यावर अवलंबून आहे. असे सांगितले. यावेळी सरपंच सईदा पठाण, नंदकुमार राऊत यांनी वाळूज येथे उड्डाणपुलाची मागणी करताच खा. भुमरे म्हणाले की, काळजी करू नका, याविषयी मी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार आहे.
वीज महावितरणविषयी तक्रारी करताच येणाऱ्या बैठकीत त्याचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच महासंघाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
महासंघाच्या वतीने जि.प. प्रशालेत विविध स्पर्धा, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० वाजता प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. यावेळी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन गायकवाड, उत्सव समिती अध्यक्ष सचिन काकडे, उपसरपंच योगेश आरगडे, दिलिपसिंग राजपुत, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, दिलीप निरफळ, मनोज जैस्वाल, अमजदखा पठाण यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सर्जेराव भोंड यांनी केले.