टिळकपथ सारख्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर पक्के बांधकाम करून रहदारीच्या रस्त्यावर कब्जा केला आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Encroachment : रहदारीच्या सार्वजनिक रस्त्यांवर व्यापाऱ्यांचा बेकायदा कब्जा

विनापरवानगी बांधकाम, कारवाईऐवजी मनपा अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणालाच खतपाणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी सारख्या गजबजलेल्या आणि कायम वर्दळीच्या ठिकाणी रहिवासी वसाहतीत काही व्यावसायिकांकडून त्यांच्या दुकानांसमोर सुमारे ५ ते १० फुटांपर्यंत पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. मनपाची परवानगी न घेता इमारतींवर वरचा मजलाही चढवला आहे. गंभीर बाब म्हणजे, याबाबतच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांकडूनच अतिक्रमणाला खतपाणी घातले जात आहे.

बाजारपेठेतील सार्वजनिक रस्त्यावर एका व्यापाऱ्याने अतिक्रमण केले की, त्याच्या आड बाजूच्या दुसऱ्या, तिसऱ्या व्यावसायिकांनीही रहदारीच्या रस्त्यावर कब्जा केलाच म्हणून समजा. अशाच अतिक्रमणाचा प्रकार शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या टिळकपथ ते गोमटेश मार्केटकडे निघणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यांवर झाल्याचे समोर आले आहे. येथील एका व्यापाऱ्याने दुकानांसमोर पक्के ओटे बांधले आहेत. त्यावर लोखंडी शेड उभारून चक्क गोडाऊनही उभे केले आहे.

महापालिकेकडून परवानगी न घेता इमारतीवर वरच्या मजल्यावर पक्के बांधकाम करण्यापर्यंत हा व्यापारी धजावला आहे. त्याच्या आड शेजाऱ्यानेही नवीन टोलेजंग इमारतीलाही बाहेरून जीना, त्याखाली एक पक्की खोली बांधून अतिक्रमण केले आहे. तिसऱ्यानेही दुकानांसमोर पक्का ओटा आणि त्यासमोर जीना काढून सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावरच बेकायदेशीर कब्जा केला आहे. यामुळे इतर रहिवाशांना तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

काय म्हणतात जबाबदार मनपा अधिकारी

वॉर्ड कर्मचारी पाठवून माहिती घेतली. बेकायदा बांधकाम केले आहे. परवानगी न घेता वरचा मजला बांधला आहे. थेट पाडापाडीची कारवाई होईल, परंतु आमच्याकडे बांधकाम निरीक्षक नाही. तुम्हालाच काय करायचे ते करा, असे सांगत वॉर्ड अधिकारी मोरे यांनी जबाबदारी झटकली.

या अतिक्रमणाला आर्शीवाद कुणाचा ?

महापालिकेकडून शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवले जाते. मात्र बाजारपेठांमधील रहदारीच्या रस्त्यांवरच बांधकाम वाढवून बेकायदा कब्जा केलेल्या दुकानदारांकडे साफ दुर्लक्ष केले जाते. नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने या अतिक्रमणांना अभय कुणाचा? यात अर्थपूर्ण डोळेझाक तर नाही, अशी शंका निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT