Enchanted by Kabir's voice; Huge response to Kahat Kabir programme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : "बुरा जो देखन मैं चला, बुरा न मलियिा कोय; जो दलि खोजा आपना, मुझसा बुरा न कोय..." या संत कबीरांच्या कालातीत ओळींनी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात उपस्थित रसिकांना अंतर्मुख केले. संत कबीर जयंतीनिमित्त संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कहत कबीर या गीतगायन कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कबीर मठाचे मठाधिपती महंत शांतीदास, अनुराधाताई कदम, कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्रा. संजय मोहोड, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, विभागप्रमुख राजू सोनवणे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
गायक राहुल खरे यांनी संत कबीरांच्या तत्त्वज्ञानाने समृद्ध अशा रचना आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण गायकीतून सादर करत श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. "गुरू बिन कौन बताये वाट", "संगत मत करना खोटी", "माटी कहे कुंभार से", "मन लागो यार फकिरी में", "मौको कहाँ ढूंढे रे बंदे", "नाम जपन क्यों छोड़ दिया", "गाफील गफलत मत कर" तसेच "बुरा जो देखन मैं चला" यांसारख्या लोकप्रिय रचनांनी सभागृहात भक्तिरस आणि चिंतनशील वातावरण निर्माण केले.
राहुल खरे यांच्या गायनाला सतीश जोगदंड, गौरव ढोले, कन्हैया लाटे, राहुल शिंदे आणि सचिन राठोड यांनी सुरेल साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन राजू सोनवणे यांनी केले तर ध्वनी व प्रकाश व्यवस्थेची जबाबदारी बाबू घडलिंगे आणि योगेश सुरडकर यांनी समर्थपणे सांभाळली. संत कबीरांच्या निर्भीड, मानवतावादी आणि आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणाऱ्या विचारांनी सजलेला कहत कबीर हा कार्यक्रम संगीत, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम ठरला. उपस्थित रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद देत कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.