Eid Celebrated with Enthusiasm at Waluj
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : वाळूजसह परिसरात मुस्लिम धर्मीयांची पवित्र ईद-उल फित्र (रमजान ईद) शनिवार (दि. २१) रोजी शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ८:३० वाजता मुख्य ईदगाह मैदानात कारी मोहम्मद यासेर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज अदा करून विश्व शांती साठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी परिसरातील हिंदू बांधवांनी मुख्य ईदगाह मैदानात उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. येथील मुख्य मस्जिद असलेल्या जामा मस्जिद जवळ परिसरातील सर्व बांधव यांच्यासह आबाल वृद्ध एकत्रित येतात. ईदगाह मैदानात साडेआठ वाजता कारी मोहम्मद यासेर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली.
सर्वप्रथम जमात अमीर हाजी इब्राहीम खान पठाण यांनी ईदचे महत्त्व व जकात फितरा, सदका याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. वंश परंपरागत मुतवली इरशाद इनामदार यांनी सलाद दिली. त्यानंतर खुदबा पठण करून विश्व कल्याणासाठी तसेच सामाजिक एकात्मतेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अन्सार खा. पठाण, खालेद पठाण,इस्माईल खान पठाण, अफरोज कुरेशी, शेख वली मिया, अमजद पठाण, फेरोज कुरेशी, हाजी अहमद पटेल, नदीम झुंबर वाला, शेख तय्यब, अशपाक पटेल यांच्यासह अनेक धर्म बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बालाजी सोनटक्के, उपसभापती सचिन काकडे, योगेश आरगडे यांच्यासह अनेकांनी ईदगाह येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.