Efforts for a separate railway zone in Marathwada should be pursued by the Deputy Chief Minister to the Centre
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील रेल्वे प्रशासन अधिक प्रभावी करण्याबरोबरच रखडलेल्या रेल्वे विकासकामांना गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र रेल्वे झोन स्थापन करावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी २७ ऑगस्ट रोजी पत्र देऊन केंद्राकडे पाठपुरावा केला.
मराठवाडा हा राज्याच्या समतोल विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून, या भागातील रेल्वे प्रशासन सध्या विविध झोन आणि मंडळांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण तसेच प्रवासी सुविधांशी संबंधित विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वे हे अत्यंत महत्त्वाचे वाहतूक माध्यम आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या विभागणीमुळे या भागातील विविध प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला आहे. पर्यटन, रोजगाराला चालनाछत्रपती संभाजीनगर हे औद्योगिक, पर्यटन आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे.
'ऑरिक', अजिंठा-वेरूळ पर्यटन क्षेत्र तसेच मराठवाड्यातील औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता या भागासाठी सक्षम रेल्वे पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. स्वतंत्र रेल्वे झोन स्थापन झाल्यास मालवाहतूक, पर्यटन, रोजगार आणि व्यापाराला चालना मिळण्यासोबतच मराठवाड्याच्या एकात्मिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
स्वतंत्र रेल्वे झोनचे संभाव्य फायदे
मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांना प्राधान्य मिळणे
नवीन रेल्वे मार्गांच्या कामांना गती मिळणे
रखडलेल्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामांना वेग
प्रवासी सुविधांचा विस्तार
औद्योगिक क्षेत्रासाठी मालवाहतुकीच्या सुविधा वाढणे
अजिंठा-वेरूळसह पर्यटन विकासाला चालना
रोजगार आणि व्यापाराच्या संधी वाढणे
मराठवाड्याच्या एकात्मिक विकासाला गती