school staff Pudhari
छत्रपती संभाजीनगर

लाखोंचा खर्च अन् पट संख्या वाढीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

शिक्षण विभागाच्या कामावर सभापती संतापले, शुक्रवारी पुन्हा घेणार बैठक

पुढारी वृत्तसेवा

Education Department's indifference towards expenditure of lakhs and increase in number of students

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका शिक्षण विभागासह शिक्षकांवर कोट्यवधींचा खर्च करते. मात्र, तरीही विद्यार्थी संख्येत होणारी घट का थांबत नाही. कामकाजात सुधारणा आणा, शिक्षणाचा दर्जेत सुधारणा करा, असा निर्वाणीचा इशारा सोमवारी (दि. २३) शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपायुक्त अंकुश पांढरे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती मकरिये यांच्या दालनात सोमवारी दुपारी बैठक झाली. त्यात सभापतींना शिक्षण विभागाने कार्यरत असलेल्या शाळा व त्यातील विद्यार्थी संख्येची माहिती दिली.

त्यात काही शाळांमध्ये २० ते २५ हून कमी पटसंख्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, असे असताना त्या शाळांवर शिक्षकांची संख्या भरमसाठ आहे. यावर त्यांनी त्या शाळेच्या मुख्यध्यापकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यध्यापकाला माहिती देणे शक्य झाले नाही.

हा प्रकार पाहून सभापती मकरिये संतापले. त्यांनी उपायुक्त पांढरे यांना शिक्षण विभागाच्या कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. दरम्यान, मराठी आणि उर्दू माध्यमच्या शाळांसाठी विद्यार्थीच मिळत नसल्याची स्थिती आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आयुक्त जी. श्रीकांत यांनी मागील दोन वर्षांत प्रचंड प्रयत्न केले. शिवाय शाळा दत्तक घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी विविध खेळांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण नियुक्त केले. संगीताचे देखील प्रशिक्षण सुरू केले. मात्र, त्यानंतरही महापालिकेच्या शाळेच्या पटसंखेत वाढ झाली नाही.

पटसंख्या घटल्याने शाळा बंद

शहरात महापालिकेच्या ८९ शाळा होत्या. त्यापैकी सध्या ५६ शाळाच अस्तित्वात आहेत. यात मराठी, उर्दू माध्यमच्या शाळांचा समावेश असून मागील पाच वर्षांपासून सीबीएसई पॅटर्नच्या शाळाही सुरू केल्या आहेत. या शाळांना चांगला प्रतिसाद आहे. मराठी, उर्दू शाळांना प्रतिसाद मिळत नसल्याने कमी पटसंख्या असलेल्या काही शाळा बंद केल्या जाण्याचे संकेत सभापतींनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT