E-Shivai service on Pune- Chhatrapati Sambhaji Nagar Route
जे. ई. देशकर, छत्रपती संभाजीनगर
ई-शिवाई बसमधून आरामदाई प्रवास आणि प्रवाशांना मिळणाऱ्या अत्याधुनिक सेवा यामुळे पुणे मार्गावरील प्रवाशांकडून ई-बसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ई-बस आणि शिवशाही अशा दोन्ही बस प्रवाशांना सेवा देत आहेत. परंतु प्रवाशांचा कल ई-बसकडे जास्त असल्यामुळे लवकरच या मार्गावरील प्रवाशांना सकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत ई-शिवाईची सेवा उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे लवकरच हा मार्ग शिवशाहीमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सध्या पुणे मार्गावर छत्रपती संभाजीनगरच्या १० ई-शिवाई व ११ शिवशाही आणि पुणे आगारांच्या १० ई-शिवाई व ४ ते ५ शिवशाही अशा ३५ बस प्रवाशांना सेवा देत आहेत. सुरुवातीला शिवशाही बसला पसंती देणारा प्रवासी वर्ग आरामदाई आणि पर्यावरणपूरक सेवा देणाऱ्या ई-शिवाईकडे वळला आहे. त्यामुळे या मार्गावर पूर्ण ई-शिवाईची सेवा देण्याचा प्रयत्न एसटीकडून होत आहे. ही सेवा सकाळी सव्वापाच ते रात्री पावणेअकरा पर्यंत राहणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली.
लवकरच येणार ८ ई-बस नुकत्याच मुख्यबसस्थानक आगाराला ५ ई-शिवाई बस पुणे मार्गावर सेवा देण्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर छत्रपती संभाजीनगरच्या १० आणि पुणे आगारांच्या १० अशा २० बस सेवा देत आहेत. येत्या आठवडाभरात आणखी ८ ई-शिवाई प्राप्त होणार आहेत, त्यामुळे संभाजीनगरच्या १८ आणि पुणे आगारांच्या १८ अशा ३६ ई-शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत राहणार आहेत. त्यामुळे यामार्गावर सेवा देणाऱ्या १५ ते १६ शिवशाही बस इतर मार्गावर चालवण्याच्या हालचाली सुरू असून, हा मार्ग लवकरच शिवशाही मुक्त होणार आहे.
अशी धावेल ई-शिवाई
सकाळी ५.१५ ते दुपारी १.२५ पर्यंत सेवा
दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध
दुपारी २.४५ ते रात्री १०.४५ पर्यंत सेवा
दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध
दुपारी १.२५ ते २.४५ दरम्यान इतर आगारांच्या बस उपलब्ध