Drug syndicate busted in Mukundwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सिरप सिंडिकेटचा मास्टरमाइंड कल्पेश अग्रवाल हा मध्यंतरी सहा वर्षे मुकुंदवाडी भागात वास्तव्यास होता. त्याने साथीदार सय्यद नबी, फरार आरोपी ज्ञानेश्वर मनोहर यादव ऊर्फ माउली (रा. जयभवानीनगर) सोबत नशेचा धंदा सुरू केला होता. मात्र २०१८ मध्ये एमआयडीसी वाळूजला अग्रवालसह नबीवर एनडीपीएसचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याने शहर सोडून धुळे गाठले. मात्र तेथूनही त्याने नशेचा गोरखधंदा याच दोन साथीदारांसोबत सुरू ठेवल्याचे समोर आले. माऊली कोणाच्या जीवावर बिनबोभाटपणे नशेचा धंदा करत होता ? मुकुंदवाडी पोलिसांना याची माहिती नव्हती का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजी आमखास मैदानावर सिरप, बटन गोळ्या विक्रीसाठी आलेल्या अग्रवालसह सय्यद नबीला पकडले होते. त्याच्याकडे सिरपचे चार बॉक्स सापडले होते. तपासात त्याने मुकुंदवाडीचा ज्ञानेश्वर यादव ऊर्फ माऊलीला माल दिल्याची कबुली दिली. मात्र कुणकुण लागताच माऊली फरार झाला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मुळापर्यंत जाऊन कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी तीन पथके स्थापन करून तपासाला गती दिली. अग्रवालच्या चौकशीत इंदौरचा दुर्गेश रावत आणि अहमदाबादचा धर्मेंद्र प्रजापती यांच्याकडून कोडीन सिरपचा साठा आणून नशेसाठी विक्री करत असल्याचे समोर आले. धुळे, इंदौर आणि अहमदाबाद येथे जाऊन तब्बल १८ हजार ३६० सिरप बाटल्यांचा साठा पोलिसांनी जप्त करून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. या सिंडिकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मुकुंदवाडीच्या मुकेश साळवे टोळीवर मोक्का लावला. डीसीपी प्रशांत स्वामी यांनी तब्बल ८ गुन्हेगारांना तडीपार केले. तरीही 1 मुकुंदवाडी पोलिसांना गुन्हेगारी व नशेखोरीच्या धंद्यांवर आवर घालता आलेला नाही. अग्रवाल हा माऊलीला सिरप, गोळ्याचा पुरवठा करून गोरखधंदा चालवित होता. मात्र मुकुंदवाडी पोलिसांना याची साधी भनक लागली नाही. त्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नशेखोरीच्या या नव्या सिंडिकेटला बळ मिळाल्याची चर्चा आहे.
शहर गुन्हेगारी, नशामुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नार्कोटिक्स बाबत झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. दहाच महिन्यांत २६० गुन्हे दाखल करून ४०० आरोपींना बेड्या ठोकल्या. वाळूज भागातील कारवाईत सिरप सिंडिकेटचे ४१ पेडलर्स निष्पन्न केल्यापासून शहरातील नशेचा धंदा करणारे अनेक पेडलर्स भूमिगत झाले असून, पोलिस आयुक्तांचा धसका घेतला आहे. दरम्यान, अग्रवालशी संबंधित पेडलर्सनी मुकुंदवाडी, चिकलठाणा, पुंडलिकनगर भागातील नवीन सिंडिकेट सुरू केली होती. त्यातील पेडलर्सचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. अग्रवालच्या मोबाईल कुंडलीत अनेकांचे व्यवहार समोर आले आहेत.