छत्रपती संभाजीनगर : अवघ्या सोळाव्या वर्षी कामानिमित्त राज्याबाहेर गेलेला नवतरुण नशेखोरीच्या विळख्यात अडकला. हळूहळू नशेचे प्रमाण वाढून तीन वर्षांत गंभीर परिस्थिती झाली. व्यसनासाठी हा तरुण आक्रमक होऊ लागल्याने अखेर घरच्यांनी उपचारासाठी घाटी येथे दाखल केले आहे.
नशेखोरीच्या गर्तेत
मौजमजा म्हणून केवळ जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांची चव चाखणारे नंतर हळूहळू नशेखोरीच्या गर्तेत आपोआपच अडकतात. यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. आजच्या घडीला हजारो-लाखो तरुण नशेखोरीच्या विळख्यात गुरफटले असून, याचे दुष्परिणाम त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत. याची एक नाही तर अनेक उदाहरणे आहेत. संगतीत नुकतेच घाटीत दाखल एक नवतरुण वयाच्या १६ व्या वर्षी कामधंदा करण्यासाठी राज्याबाहेर गेला. तिथे वाईट सापडल्याने नाकावाटे केल्या जाणाऱ्या व्यसनाची सवय लागली. हळूहळू ही सवय वाढली.
घरच्या लोकांना हे समजल्याने त्यांनी त्या तरुणाला परत बोलावले, मात्र तोपर्यंत तो पूर्णपणे व्यसनाधीन झालेला होता. इथेही व्यसनाची मागणी करू लागला. न मिळाल्यास आक्रमक होऊन धिंगाणा करत होता. घरचे त्याच्या या सवयीमुळे चिंता करु लागले होते. अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र सुधारणा होत नसल्याने अखेर घरच्यांनी उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे नेले. नुकतेच चार दिवसांपूर्वी त्यास घाटीत दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वॉर्डातही करतो नशेची मागणी
कोवळ्या वयात नशेखोरीची सवय लागल्याने तरुणाच्या मानसिक, शारीरिक स्थितीवर परिणाम झाला आहे. सलग तीन वर्षांपासून व्यसनाच्या गुरफट्यात अडकलेला हा तरुण उपचारासाठी दाखल केले तेव्हा व्यसनाची मागणी करत होता. प्रसंगी आक्रमक होऊन आरडाओरडही करत होता. उपचाराने हळूहळू फरक पडत असल्याचे वॉर्डातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.