कन्नड : धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील मेवाड हाँटेलजवळ टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१७) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. वाजिद यासीन सैय्यद (वय ४०, रा. किन्ही ता. सोयगाव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाजिद सैय्यद हे आपल्या टेम्पो क्रं (एम.एच.०४ एफ.पी.७०६३) या टेम्पोतून चाळीसगाव येथून केळी भरुन वैजापुर धुळे-सोलापुर महामार्गावरुन जात निघाले होते. ते कन्नडजवळ येताच त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व टेम्पो पलटी झाल्याने वाजिद सैय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शहर पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश खेडेकर, प्रविण बरडे, संजय आटोळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ चालक वाजिद यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी मनिषा गीते यांनी तपासून मयत घोषित केले. डॉ. मनिषा गीते यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कन्नड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.