छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : विद्रुपीकरणावरुन मराठवाडा विद्यापीठात राडा

Shambhuraj Pachindre

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्रुपीकरणाच्या मुद्यावरुन मंगळवारी (दि.१७) मोठा राडा झाला. भिंती रंगवून विद्यापीठाचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अभावीपच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत प्रशासकीय इमारतीसमोर जमल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत ही गर्दी पांगवली. दरम्यान, आंबेडकरी संघटनांनी बुधवारी विद्यापीठ कॅम्पसमध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

विद्यापीठात कॅम्पसमध्ये दोन दिवसांपूर्वी भिंतींवर जागोजागी एबीव्हीपी ही अक्षरे लिहिली गेली. त्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आक्षेप घेतला होता. अभावीपने विद्यापीठाचे विद्रुपीकरण केले आहे तसेच हे करताना त्यांनी महापुरुषांच्या नावांच्या पाट्यांवरही अक्षरे लिहून त्यांची विटंबना केली असल्याने दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या सचिन निकम आणि कार्यकर्त्यांनी केली होती.

यानंतर विद्यापीठ प्रशासनाने लगेच चुन्याने अक्षरे मिटविली. मात्र, त्यानंतरही हे प्रकरण क्षमले नाही. मंगळवारी दुपारी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या सचिन निकम यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते विद्यापीठात दाखल झाले. त्यातील काही कार्यकर्त्यांनी विद्यापीठ कॅन्टिनमध्ये जाऊन तेथे असलेल्या अभावीपच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला.

त्यानंतरही काही कार्यकर्त्यांना प्रशासकीय इमारतीवर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर भाजपसह अभावीपचे अनेक कार्यकर्ते विद्यापीठात पोहचले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंबेडकरी कार्यकर्ते विरुद्ध अभावीपचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणा देत समोरासमोर आले. तोपर्यंत पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगवली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात तक्रार घेऊन बेगमपुरा पोलिसांत पोहचले.

अभाविपचे कार्यकर्ते सातत्याने विद्यापीठात हुल्लबाजी करतात. जाती धर्मावरुन टार्गेट करतात. याआधीही त्यांनी विद्यापीठात विद्रुपीकरण केले होते. आताही केले. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या पाट्यांवरही लिहून विटंबना केली. भविष्यात या प्रवृत्तीला अशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल.

– सचिन निकम, मराठवाडा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT