छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या खात जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. हा प्रकार मुलाच्या लक्षात येताच त्याने डॉ. हेमलता यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. हेमलता ठाकरे या उपकलुसचिव पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तसेच डोक्यावर फाईल घेऊन जातानाचा त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बुधवारी संध्याकाळी त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यांच्या खोलीत एक चिठ्ठी देखील सापडली आहे. डॉ. हेमलता ठाकरे यांचा मुलगा व्यंकटेशने पुढारी न्यूजला सांगितले की, माझी आई दररोज संध्याकाळी साडे पाच वाजता घरी येते. घरी आल्यावर ती झोपली. ती सहसा संध्याकाळी झोपत नाही. काही वेळाने आम्ही चहासाठी तिला उठवत होतो. पण ती उठली नाही. मी तातडीने रुग्णवाहिका बोलवून घेतली. तिच्याकडे झोपेच्या गोळ्या होत्या आणि तिने सर्व गोळ्या खाल्ल्या होत्या. तिच्याजवळ चिठ्ठी देखील सापडली असून यात दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. माझ्या आईने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप व्यंकटेश ठाकरे याने केला.
हेमलता यांनी कुटुंबियांना सर्दी खोकल्याच्या गोळ्या सुरू असल्याचे सांगितले होते. या गोळ्या त्यांच्याकडे कशा आल्या, त्या मानसिक तणावात होत्या का, चिठ्ठीत कोणाची नावे आहेत याचा संभीजनगर पोलीस तपास करत आहेत.