छत्रपती संभाजीनगर : शहरात श्वान पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु अजूनही बहुतांश श्वानधारकांकडे महापालिकेचा अधिकृत परवाना नाही. मात्र आता महापालिकेने या परवानाचे शुल्क ७५० वरून २०० रुपये केले आहे. त्यामुळे श्वान पाळणाऱ्या प्रत्येकाने महापालिकेकडून श्वान परवाना घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी केले आहे.
शहरात उच्चभू वसाहतीतील प्रत्येक घरामध्ये पाळीव श्वान आहेत. यातील सुमारे ३० ते ४० टक्के श्वानधारकांकडेच अधिकृत महापालिकेचा परवाना आहे. याशिवाय आता विविध वसाहतींसह फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांकडेही श्वान आहेत.
श्वान पाळण्यासाठी नागरिकांना महापालिकेकडून परवाना घेणे बंधनकार आहे. असे असतानाही अनेक जण परवान्याकडे दुर्लक्षच करतात. एवढेच नव्हे तर श्वानांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना नियमितपणे लसीकरण करणे याकडेही दुर्लक्षच करीत असतात. त्यामुळे श्वानाची लाळ आणि त्याच्या चाव्यामुळे रेबीसच्या घटना घडत आहेत. पूर्वी महापालिकेकडून श्वान परवान्यासाठी ७५० रुपये शुल्क घेण्यात येत होते, परंतु आता यात कपात करण्यात आली असून, परवान्यासाठी श्वानधारकांना केवळ २०० रुपये मोजावे लागणार आहेत. यात रेबीस प्रतिबंधक लसही देण्यात येणार आहे.
श्वान परवान्याची संख्या अशी...
२०२०-२१ : १६६
२०२१-२२ : ७७०
२०२२-२३ : ३३६
२०२३-२४ : ५१०
२०२४-२५ : ७००
मनपा हद्दीतील श्वान कर
मनपाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मनपा हद्दीतील पाळीव श्वानांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १२७ (२) (क) अंतर्गत वार्षिक श्वान परवाना (१ एप्रिल ते ३१ मार्च) कालावधीसाठी श्वान कर लावण्यात आला आहे. सध्याचे ७५० रुपये दर हे सन २०२३ पासून आकारण्यात येत आहेत. परंतु हे शुल्क अधिक असल्याने ते कपात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उपायुक्त तथा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली.